24 October 2020

News Flash

“सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीची वेळ आली तेव्हा मला…”; रोहित शर्माने सांगितला मजेदार किस्सा

सामना जिंकल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केला खुलासा

रोहित शर्मा

प्रतिस्पर्ध्याच्या घशातून विजयाचा हार कसा हिरावून घेता येतो, हे बुधवारी भारतीय संघाने दाखवून दिले. मोहम्मद शमीने अखेरच्या षटकांत अप्रतिम गोलंदाजी करत न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा ट्वेन्टी-२० सामना बरोबरीत राखल्यानंतर रोहित शर्माने ‘सुपर-ओव्हर’मध्ये शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत भारताला अनपेक्षित विजय मिळवून दिला. सलग तिसऱ्या विजयामुळे मालिकेत ३-० अशी आघाडी घेणाऱ्या भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा मालिका जिंकण्याची करामत केली. या सुपर रोमांचक सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित शर्माने सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत जाईल असं वाटलं नव्हतं असे सांगतानाच त्यामुळे आपला गोंधळ उडाल्याचं सांगितलं.

भारताची फलंदाजी कशी झाली?

प्रथम फलंदाजी करताना रोहितला अखेर सूर गवसला. रोहित आणि लोकेश राहुल यांनी भारताला ८९ धावांची सलामी दिली. रोहितने अवघ्या २३ चेंडूंतच आपले अर्धशतक पूर्ण केले. बेनेटच्या दुसऱ्या षटकांत त्याने तब्बल २७ धावा चोपून काढल्या. राहुल (२७) बाद झाल्यानंतर बेनेटने ११व्या षटकांत रोहित शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबे यांचा अडसर दूर केला. रोहितची खेळी ४० चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांनिशी ६२ धावांवर संपुष्टात आली. ३ बाद ९६ अशा स्थितीतून कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरत चौथ्या गडय़ासाठी ४६ धावांची भर घातली. श्रेयस १७ तर कोहली ३८ धावा काढून माघारी परतल्यानंतर मनीष पांडे (नाबाद १४) आणि रवींद्र जडेजा (नाबाद १०) यांनी भारताला ५ बाद १७९ धावा उभारून दिल्या.

न्यूझीलंडने असा केला पाठलाग

भारताचे १८० धावांचे आव्हान गाठताना न्यूझीलंडला गप्तिल आणि कॉलिन मुन्रो यांनी ४७ धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. हे दोघेही झटपट बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरील विल्यम्सनने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत भारतीय गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. दुसऱ्या बाजूने पडझड होत असतानाही विल्यम्सनने २८ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने कॉलिन डे ग्रँडहोमच्या साथीने पाचव्या गडय़ासाठी ४९ धावा जोडल्या. अखेरच्या षटकांत ९ धावांची आवश्यकता असताना रॉस टेलरने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत न्यूझीलंडला विजयासमीप आणले. पण मोहम्मद शमीने पुढच्या पाच चेंडूंत अवघ्या दोन धावा देत सामना बरोबरीत सोडवला. विल्यम्सनने ८ चौकार आणि ६ षटकारांनिशी साकारलेली ९५ धावांची खेळी न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यात व्यर्थ ठरली.

सुपर ओव्हरचा थरार

सामना बरोबरीत सुटल्यानंतर ‘सुपर-ओव्हर’मध्ये न्यूझीलंडने विल्यम्सन आणि गप्तिल यांना पाचारण केले. लयीत नसलेल्या बुमराने पहिल्या दोन चेंडूंत दोन धावा दिल्या. त्यानंतर विल्यम्सनने एक षटकार आणि चौकार लगावत न्यूझीलंडची धावसंख्या वाढवली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर सहाव्या चेंडूवर गप्तिलने चौकार मारल्यामुळे न्यूझीलंडने १७ धावा उभारल्या. भारताने रोहित आणि राहुलवर विश्वास दाखवला. पहिल्या चेंडूवर दोन आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत रोहितने राहुलला फलंदाजीवर आणले. राहुलने चौकार लगावून पुढच्या चेंडूवर एक धाव घेतली. भारताला १० धावांची आवश्यकता असताना रोहितने साऊदीला दोन षटकार ठोकून भारताच्या विजयावर मोहोर उमटवली.

सामना जिंकून दिल्यानंतर रोहित नक्की काय म्हणाला?

सामना झाल्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने सामना सुपर ओव्हरपर्यंत जाईल असं वाटत नसल्याने बँग आवरुन ठेवल्याचे सांगितले. “न्यूझीलंड सहजपणे हा सामना जिंकेल, असे वाटले होते. ज्या पद्धतीने ते फलंदाजी करत होते त्यानुसार सामना ‘सुपर-ओव्हर’मध्ये जाईल, याची कल्पनाही आम्ही केली नव्हती. मी माझे फलंदाजीचे सर्व सामान आधीच बॅगमध्ये आधीच पॅक करुन ठेवलं होतं. त्यामुळे ‘सुपर ओव्हर’मध्ये फलंदाजी करण्याआधी मला ते साहित्य बँगमध्ये शोधावे लागले. मला माझे अॅब्डोमन गार्ड (abdomen guard) शोधायलाच पाच मिनिटे लागली,” असं पत्रकारांना रोहितने हसत हसत सांगितले. तसेच फलंदाजी करताना डोक्यात काय विचार सुरु होते असा सवाल रोहितला विचारला असता त्याने, “फलंदाजी करताना माझ्या मनात अनेक विचार येत होते. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चुका करण्याची वाट पाहणे आणि अखेपर्यंत टिकून राहण्याचे मी ठरवले होते. शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार ठोकल्याचा आनंद होत आहे,” असं उत्तर दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 11:54 am

Web Title: took me five minutes to find my abdomen guard rohit sharma scsg 91
Next Stories
1 सायना नेहवालच्या भाजपा प्रवेशानंतर ज्वाला गुट्टाच्या शब्द’ज्वाला’
2 IND vs NZ : सामना संपताच न्यूझीलंडच्या चाहत्याकडून ‘भारत माता की जय’ची घोषणा
3 ‘माझ्यामुळे नव्हे तर शामीमुळे जिंकलो’, रोहितने ठोकला ‘सलाम’
Just Now!
X