कॅनबेरा : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेतील भारतीय संघाचा पहिला सामना शुक्रवारी इंग्लंडशी रंगणार आहे.

इंग्लंड आणि यजमान ऑस्ट्रेलिया या बलाढय़ संघांशी दोन हात केल्यामुळे भारतीय महिला संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आपले कच्चे दुवे तपासण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. भारतीय महिला संघाने २०१८च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत  उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा महत्त्वाच्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. वासिम रामन यांच्या प्रशिक्षकपदाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतींचा खूप फायदा होईल, असे हरमनप्रीतला वाटते.

‘‘गेल्या दोन विश्वचषक स्पर्धामध्ये आम्ही खूप चांगली कामगिरी केली होती. फक्त खडतर परिस्थितीत दडपण कसे हाताळायचे, याचे कौशल्य आम्हाला आत्मसात करावे लागणार आहे,’’ असे हरमनप्रीत म्हणाली.

सामन्याची वेळ : सकाळी ८.४०

थेट प्रक्षेपण : सोनी ईएसपीएन