चेन्नई : भारताचे माजी सलामीवीर आणि निवड समितीचे माजी सदस्य व्हीबी चंद्रशेखर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर त्यांनी कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांनी शुक्रवारी स्पष्ट केले आहे.

चंद्रशेखर यांनी चेन्नईतील आपल्या राहत्या घरी गुरुवारी संध्याकाळी फास लावून आत्महत्या केली होती. ‘‘कर्जाचा बोजा वाढू लागल्यामुळे चंद्रशेखर गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त दिसत होते. मात्र तब्येत खालावू लागल्यामुळे ते प्रकाशझोतात आले होते,’’ असे पोलिसांनी सांगितले. चंद्रशेखर यांनी नुकत्याच संपलेल्या तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये व्हीबी कांची वीरन्स हा संघ विकत घेतला होता. त्यातूनच त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला होता.

‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या चंद्रशेखर यांनी कर्जाच्या कारणास्तव आपले जीवन संपवल्यामुळे तमिळनाडू क्रिकेटवर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्स संघात आणण्यात चंद्रशेखर यांनी मोलाचा वाटा उचलला होता,’’ असे सूत्रांनी सांगितले. चंद्रशेखर यांच्या निधनानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्यासहित अनेक आजी-माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे.