भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. १-१ अशा बरोबरीत असलेल्या कसोटी मालिकेत चौथा सामना भारताने जिंकला आणि यजमानांचा अबाधित गड सर केला. त्या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता भारताची पुढील कसोटी मालिका इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर असणार आहे. चार कसोटी सामन्यांची ही मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडूंनी थोड्याफार प्रमाणात सरावाला सुरूवात केली आहे. इंग्लंडने कालच श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका २-०ने जिंकली असून त्यांचा संघही लवकरच भारतात दाखल होणार आहे. या दरम्यान इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने भारतीय संघाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

Video: लाईव्ह पत्रकार परिषद सुरू असताना स्मिथचा मुलगा बूट घेऊन आला अन्…

“भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय मिळवला. सुरूवातीला भारत १-०ने पिछाडीवर होता. भारताचा संपूर्ण डाव ३६ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर त्यांचा कर्णधार विराट कोहलीदेखील पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. भारताचे आघाडीचे गोलंदाज आणि काही महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. पण तरीही त्या संघाने दमदार पुनरागमन करत कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. अशा भारतीय संघाला अजिबात कमी लेखून चालणार नाही. आणि त्यांच्यावर दबावही टाकता येणार नाही”, असं महत्त्वपूर्ण विधान नासिर हुसेनने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना केलं.

IND vs ENG: ना विराट, ना रोहित… ‘हा’ परदेशी फलंदाज मोडेल सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम!

“टीम इंडिया सध्या तुफान फॉर्मात आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघातील खेळाडूंच्या आक्रमकतेत वाढ होते. तशातच घरच्या मैदानावर भारतीय संघाची कामगिरी खूपच चांगली आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंवर दडपण आणणं किंवा त्यांच्याशी शाब्दिक चकमकी करून त्यांच्यावर दबाव टाकणं या गोष्टी प्रतिस्पर्धी संघाला शक्य नाहीत”, असंही हुसेन याने स्पष्ट केलं.