मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवचं भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न अजुनतरी अपूर्णच राहणार आहे. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सूर्यकुमारला टी-२० आणि वन-डे संघात स्थान मिळण्याची अपेक्षा होती. परंतू सुनिल जोशी यांच्या निवड समितीने सूर्यकुमारच्या नावाचा विचारही केलेला नाही. आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करत असलेला सूर्यकुमार यादव चांगल्याच फॉर्मात आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने महत्वाची भूमिका बजावली असून ११ सामन्यांत २ अर्धशतकांच्या सहाय्याने त्याने २८३ धावा केल्या आहेत.

अवश्य पाहा – भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, टी-२० ते कसोटी संपूर्ण संघ एका क्लिकवर

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमारला त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा देत असताना भारतीय संघात खेळण्यापासून तू काही पावलं दूर असल्याचं सांगितलं होतं. यानंतर सूर्यकुमारला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात स्थान मिळणार अशी चर्चाही सुरु झाली होती. परंतू पुन्हा एकदा मुंबईच्या या गुणवान खेळाडूच्या पदरी उपेक्षाच आली आहे.

सप्टेंबर महिन्यात आपला ३० वा वाढदिवस साजरा केलेल्या सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यांत ४४ च्या सरासरीने ५ हजार ३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६ च्या सरासरीने २ हजार ४४७ धावा केल्या आहेत तर टी-२० प्रकारात त्याने १६० सामन्यात ३१.३८ च्या सरासरीने ३ हजार २९५ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये ९६ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने २८.५५ च्या सरासरीने १ हजार ८२७ धावा केल्या आहेत.