आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिन तेंडुलकरने निवृत्ती स्विकारुन बराच कालावधी उलटला. तरीही सचिनच्या शतकांचा विक्रम कोण मोडणार याची चर्चा अजुनही सुरुच असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर शंभर शतकांचा विक्रम जमा आहे. सध्याच्या काळात फॉर्मात असलेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सचिनचा हा विक्रम मोडणार का यावरुन चाहत्यांमध्ये बरीच मतमतांतर आहेत. इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पिटरसनने विराट कोहली सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडू शकणार नाही असं वक्तव्य केलं आहे.

“सचिन आणि विराट यांच्या स्वभावामुळे खूप मोठा फरक आहे. सचिन मैदानात असताना कधीही आक्रमक वागायचा नाही, तो त्याचा खेळ कसा चांगला होईल याकडे लक्ष द्यायचा. विराटच्या बाबतीत असं नाहीये, तो मैदानात बराच आक्रमक असतो. कोहली आणखी किती वर्ष क्रिकेट खेळतो यावरही तो सचिनचा शतकांचा विक्रम मोडेल की नाही हे अवलंबून आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत टी-२० आणि आयपीएल फार कमी प्रमाणात खेळलं आहे. मात्र विराट वन-डे, टी-२०, कसोटी आणि आयपीएल अशा चारही महत्वाच्या स्पर्धा खेळतोय. त्यामुळे दुखापतींचा मुद्दा लक्षात घेता सचिनचा विक्रम विराट मोडू शकेल असं मला वाटत नाही.” केविन timesnow.com ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.