आयओसीकडून खुलासा
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळण्याचा निर्णय अद्याप अंतिम नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे. कुस्तीला वगळण्याचा निर्णय आयओसीने घेतल्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व कुस्तीच्या पाठिराख्यांमध्ये खळबळ उडाली होती.
आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने आयओसीच्या निर्णयाविरुद्ध अमेरिकेतील न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. आयओसीच्या १५ सदस्यांच्या कार्यकारिणीने केवळ शिफारस केली आहे.
या निर्णयाबाबत आयओसीच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम मतदान केले जाणार असे आयओसीने म्हटले आहे. आयओसीचे उपाध्यक्ष थॉमस बॅच म्हणाले, या निर्णयाबाबत खेळाडू, प्रशिक्षक, संघटक यांच्या  प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. मात्र पारंपरिक खेळ व प्रगती यांचा समतोल राखण्याची आवश्यकता होती. आम्ही सर्व खेळांचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे.
आम्ही अद्यापही या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही. कुस्ती महासंघाने योग्य रीतीने लढा दिला तर त्यांना लोकांची सहानुभूती मिळू शकेल तसेच लोकांनी दडपण आणले तर या निर्णयात बदल होऊ शकतो असेही बॅच यांनी
सांगितले. दरम्यान, आयओसीच्या या निर्णयाला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोध दर्शवला असून या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले आहे.

पुन्हा समावेशाबाबत आयओए आशावादी
ऑलिम्पिकमधून कुस्तीला वगळण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी व खेळास मारक आहे. आयओसीने या निर्णयाबाबत पुन्हा विचार करावा असे आवाहन भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) केले आहे. आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी सांगितले, या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये पुन्हा समावेश होईल, अशी आम्हाला आशा आहे. यासाठी जागतिक कुस्ती महासंघास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.  

कुस्ती संघटकांना रॉज भेटणार
आयओसीचे अध्यक्ष जॅक रॉज यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. या चर्चेत कुस्तीचा पुन्हा कसा समावेश केला जाईल याबाबत पदाधिकाऱ्यांची बाजू ते ऐकणार आहेत. महासंघाचे अध्यक्ष रॅफेल मार्टिनेटी यांनी आपल्याशी संपर्क साधला असून आम्ही लवकरच ही चर्चा करणार आहोत असे रॉज यांनी सांगितले.