Abhishek Sharma World Record IND vs AUS 5th T20I: भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात अभिषेकने विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. टी-२० मालिकेतील अखेरचा टी-२० सामना ब्रिस्बेन गाबामध्ये खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यादरम्यान प्रथम फलंदाजी करताना अभिषेकने हा विक्रम आपल्या नावे केला.

भारतीय संघाचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने आक्रमक सुरुवात केली. अभिषेक शर्माने डावात ११ धावा करताच विश्वविक्रम नोंदवला. अभिषेक शर्माला ४ षटकांतच दोन वेळा जीवदान मिळालं आहे. यादरम्यान त्याने चौकार-षटकारांची आतिषबाजी कायम ठेवली आहे.

अभिषेक शर्माने घडवला इतिहास

गाबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यात अभिषेक शर्मा टी-२० आतंरराष्ट्रीय मध्ये सर्वात जलद हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. अभिषेक शर्माने सर्वात कमी चेंडूत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. त्याच्याआधी कोणत्याही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही.

अभिषेक शर्मापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियन खेळाडू टिम डेव्हिडच्या नावावर होता, ज्याने ५६९ चेंडूंमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. अभिषेक शर्माने आता फक्त ५२८ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचे नाव आहे, ज्याने ५७३ चेंडूत एक हजार टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वात कमी चेंडूत १ हजार धावा पूर्ण करणारे खेळाडू

अभिषेक शर्मा (भारत) – ५२८ चेंडू
टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया) – ५६९ चेंडू
सूर्यकुमार यादव (भारत) – ५७३ चेंडू
फिल सॉल्ट (इंग्लंड) – ५९९ चेंडू

अभिषेक शर्मा टी-20मध्ये ही कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वात कमी डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, त्याने २७ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. आता अभिषेक शर्मा या यादीत थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्यामध्ये त्याने २८ डावांमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. २०२५ मध्ये अभिषेक शर्मा वादळी फॉर्मात दिसत आहे.