मध्य प्रदेशचा खेळाडू आदित्य जोशी याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद मिळवीत कनिष्ठ गटाच्या सुशांत चिपलकट्टी स्मृती आंतरराष्ट्रीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला. मुलींमध्ये ऋत्विका शिवानी या भारताच्याच खेळाडूने अजिंक्यपद मिळविले, तर जे. मेघना हिने महिला दुहेरी व मिश्रदुहेरी या दोन्ही गटांतील विजेतेपदासह दुहेरी कामगिरी केली.
लक्ष्मी क्रीडा मंदिर बॅडमिंटन क्लबतर्फे ही स्पर्धा मॉडर्न क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती. मुलांच्या एकेरीत द्वितीय मानांकित आदित्य जोशी याने अंतिम लढतीत एम. कनिष्क या आंध्र प्रदेशच्या खेळाडूवर मात केली. चुरशीने झालेला हा सामना त्याने २२-२०, २१-१५ असा जिंकला. त्याने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा उपयोग केला. कनिष्कने पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिली, मात्र दुसऱ्या गेममध्ये त्याला अपेक्षेइतका आपला दर्जा उंचावता आला नाही. त्याचा फायदा घेत आदित्यने विजय मिळविला. तो बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. आदित्य याने अरुण जॉर्ज याच्या साथीत दुहेरीतही अजिंक्यपद मिळविले. या जोडीने चिराग शेट्टी व एम.आर.अर्जुन यांना २१-१७, २१-१२ असे हरविले.
मुलींच्या एकेरीत गतविजेत्या ऋत्विका शिवानी हिने अजिंक्यपद मिळवीत अव्वल मानांकन सार्थ ठरविले. तिने अंतिम लढतीत सिंगापूरच्या लियांग झिओयु हिच्यावर १६-२१, २१-१६, २१-१३ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये लियांगने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या गेममध्ये शिवानी हिने स्मॅशिंगच्या बहारदार फटक्यांबरोबरच खेळावरील पकड कायम ठेवीत विजयश्री खेचून आणली. ती हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीत सराव करीत आहे.
मुलींच्या दुहेरीत मेघना व के. मनीषा या अग्रमानांकित जोडीने करिश्मा वाडकर व रेवती देवस्थळी या महाराष्ट्राच्या जोडीवर मात करीत अजिंक्यपद मिळविले. ही लढत त्यांनी २१-१०, २१-१० अशी लीलया जिंकली. मिश्र दुहेरीत मेघना हिने संयम शुक्ला याच्या साथीत अजिंक्यपद मिळविले. त्यांनी सौरभ शर्मा व के. मनीषा यांना २५-२३, २१-१६ असे संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभूत केले.