Venkatesh Prasad on Team India: टीम इंडियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. किंग्स्टन, ब्रिजटाऊन येथे शनिवारी (२९ जुलै) झालेल्या सामन्यात भारतीय संघ केवळ १८१ धावा करू शकला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ८० चेंडू राखून लक्ष्य गाठले. उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या ब्रायन लारा अ‍ॅकॅडमी स्टेडियमवर खेळवला जाईल.

दुसऱ्या ‘वन डे’तील पराभवानंतर टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने रोहित ब्रिगेडवर जोरदार टीका केली आहे. ५७ वर्षीय व्यंकटेश प्रसाद म्हणाला की, “मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी लज्जास्पद आहे. भारतीय संघाला छोटे-छोटे यश साजरे करण्याची सवय झाली आहे.” आगामी विश्वचषक २०२३च्या पार्श्वभूमीवर त्याने संघ बांधणीबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

व्यंकटेश प्रसादने ट्वीट केले की, “कसोटी क्रिकेट वगळता उर्वरित दोन फॉरमॅटमध्ये भारताची कामगिरी गेल्या काही काळापासून अतिशय सामान्य आहे. टीम इंडियाने मागील एक वर्षात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका गमावली. गेल्या दोन टी२० विश्वचषकांमध्ये खराब कामगिरी केली. आम्ही इंग्लंडसारखा उत्तेजक संघ नाही किंवा ऑस्ट्रेलियन संघासारखा आक्रमकही नाही. मग, भारत नक्की काय करतो आहे?”

व्यंकटेश प्रसाद यांनी टीम इंडियावर सडकून टीका केली. त्याने ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, ‘पैसा आणि पॉवर असूनही आम्हाला चांगली कामगिरी करता येत नाही. कारण, आम्हाला छोटे यश साजरे करण्याची सवय झाली आहे. चॅम्पियन संघ बनण्यापासून तर आम्ही खूप दूर आहोत. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी खेळतो आणि भारतही तेच करतो. पण इतर संघांचा दृष्टीकोन आणि वृत्ती ही वेगळी असून भारताच्या बाबतीत थोडी वेगळी गोष्ट आहे. ते नेहमी मोठ्या संघांविरुद्ध बचावात्मक खेळतात. त्यामुळेच कधीकधी त्यांच्या खराब कामगिरीला ही मानसिकता कारणीभूत ठरते.”

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या ‘वन डे’मध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले. सामन्यात भारताची धावसंख्या एके काळी एकही बिनबाद ९० धावा होती, पण त्यानंतर टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली. भारताकडून इशान किशन (५५), शुबमन गिल (३४), सूर्यकुमार यादव (२४), शार्दुल ठाकूर (१६) आणि रवींद्र जडेजा (१०) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोती आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

हेही वाचा: MLC Final 2023: निकोलस पूरनचे वादळी शतक! अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये मुंबई न्यूयॉर्क संघाने पटकावले जेतेपद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्युत्तरात कर्णधार शाई होपच्या शानदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने सहज लक्ष्य गाठले. होपने ८० चेंडूंचा सामना करत नाबाद ६३ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि तब्बल षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी किसी कार्टीने ६५ चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावा केल्या. कार्टी आणि होप यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली. या पराभवासह भारताचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डेत सलग ९ विजयांची मालिका संपुष्टात आली आहे.