स्टावन्गर : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या महत्त्वाच्या दिवशी भारताच्या जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशला संघ सहकारी अर्जुन एरिगेसीकडूनच पराभव पत्करावा लागला. स्पर्धेत सलग दुसऱ्या डावात गुकेशवर पराभवाची नामुष्की ओढवली. त्याचवेळी हिकारू नाकामुराने आर्मागेडॉन डावात मॅग्नस कार्लसनला हरवले.
सहा खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत गुकेशकडे संभाव्य विजेता म्हणून बघितले जात होते. मात्र, दोन फेऱ्यांनंतर सध्या तरी तो गुणतालिकेत तळाशी आहे. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेला भारताचाच अर्जुन एरिगेसी आणि अमेरिकेचा ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा ४.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.
गुकेश आणि अर्जुन या भारतीयांमधील लढतीत कमालीचा संघर्ष बघायला मिळाला. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या अर्जुनने सुरुवातीला चांगली आघाडी घेतली होती. मात्र, गुकेशने बचाव भक्कम ठेवत पटावर संमिश्र स्थिती निर्माण केली होती. ही लढत वेळेच्या बंधनात अडकणार हे स्पष्ट होते. अशा संघर्षपूर्ण स्थितीत चार तासांपेक्षा अधिक चाललेल्या डावात अखेर अर्जुनने बाजी मारली.
या वर्षाच्या सुरुवातीलाही २१ वर्षीय अर्जुनने टाटा स्टिल बुद्धिबळ स्पर्धेत गुकेशचा पराभव केला होता. गुकेश त्यावेळी विजेतेपदाच्या उंबरठ्यावर होता. मात्र, या एका पराभवाने गुकेशला विजेतेपदापासून दूर जावे लागले होते. स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या एरिगेसीने गुकेशला ६२व्या चालीत पराभव मान्य करण्यास भाग पाडले.
दरम्यान, कार्लसन आणि नाकामुरा या खेळाडूंमधील बहुप्रतीक्षित लढत अपेक्षेप्रमाणे शांत पद्धतीने झाली. या सुरुवातीवर कार्लसन समाधानी होता. दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांनी संपूर्ण डावात अचूकता जराही सोडली नाही. त्यामुळे डाव अनिर्णित राहिला. यानंतर झालेल्या आर्मागेडॉन डावात कार्लसनने सुरुवातीपासून कमालीचा आक्रमक खेळ करुन पटावरील स्थितीवर नियंत्रण असल्याचे दाखवून दिले.