सातत्यपूर्ण कामगिरीशी झगडत असल्यामुळे होत असलेल्या टीकेला गॅरेथ बॅलेने त्याच्या पद्धतीने उत्तर दिले. रिअल माद्रिदने जेम्स रॉड्रिग्ज आणि बॅलेच्या दोन गोलच्या बळावर रिअल बेटीसवर ५-० असा दणदणीत विजय साजरा केला. राफेल बेनिटेझ यांच्या मार्गदर्शनाखालील माद्रिदचा हा पहिला विजय ठरला.
गेल्या आठवडय़ात माद्रिदला नवख्या स्पोर्टिग गिजॉन संघाविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. या लाजिरवाण्या कामगिरीनंतर माद्रिदने रविवारी दमदार खेळ केला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला जेम्स रॉड्रिग्जच्या क्रॉसवर बॅलेने हेडरद्वारे माद्रिदसाठी पहिला गोल केला. त्यानंतर ३९व्या मिनिटाला रॉड्रिग्जने फ्री-किकवर गोल करून पहिल्या सत्रात माद्रिदला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रातही माद्रिदने आपला झंझावात कायम राखला.
बॅलेच्या पासवर करीम बेन्झेमाने गोल करीत आघाडी आणखी भक्कम केली. तीन मिनिटांच्या आत रॉड्रिग्जने दुसरा गोल नोंदवून माद्रिदला ४-० असे आघाडीवर ठेवले. अखेरच्या मिनिटाला बॅलेने गोल करताना माद्रिदच्या विजयावर ५-० असे शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या लढतीत बार्सिलोनाने थॉमस वेर्माएलेनच्या (७३ मि.) एकमेव गोलच्या जोरावर मलागा क्लबवर १-० असा विजय साजरा केला, तर सेल्टा डी व्हिगोनेही ३-० अशा फरकाने रायो व्हॅलेसानोचा पराभव केला. सेल्टा डी व्हिगोकडून नोलिटोने दोन, तर फोंटासने एक गोल केला.