संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघामध्ये एकाचवेळी अनेक बदल पहायला मिळतील. टी २० विश्वचषकानंतर विराट कोहली स्वत:हून मर्यादित षटकांचं कर्णधार पद सोडण्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये रंगलीय. भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्णधाराबरोबरच संघाच्या मुख्य प्रशिक्षकांसंदर्भातही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. क्रिकेट वर्तुळामधील दबक्या आवाजातील चर्चा आणि बातम्यांनुसार भारतीय क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ नावाने लोकप्रिय असणारा राहुल द्रविड भारताच्या मुख्य संघाचा पुढील प्रमुख प्रशिक्षक बनू शकतो. द्रविडला सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यानंतर प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं.
नक्की पाहा हे फोटो >> आधी घटस्फोट नंतर प्रेयसीसोबत ब्रेकअप, आता ‘बॅचलर्स’ राहण्यासाठी क्रिकेटपटूने घेतलं ७० कोटींचं घर
माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने यासंदर्भात संकेत दिले आहेत. रवि शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रविडला प्रशिक्षक पदासाठी विचार केला जाऊ शकतो असं गांगुलीने इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये म्हटलंय. मात्र त्याच वेळी गांगुलीने द्रविडला पूर्णवेळ प्रशिक्षक बनवण्याऐवजी हंगामी स्वरुपामध्ये त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. गांगुलीने द टेलीग्राफशी बोलताना भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक होण्यासंदर्भात बीसीसीआयचा अध्यक्ष या नात्याने आपली द्रविडशी कोणतीही चर्चा झालेली नाही असंही गांगुलीने स्पष्ट केलं आहे. “मला वाटतं की त्याला (द्रविडला) काय स्वरुपी (मुख्य प्रशिक्षक म्हणून) काम करण्यामध्ये फार रस नाहीय. अर्थात आम्ही यासंदर्भात अजून त्याच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. जेव्हा आम्ही (मुख्य प्रशिक्षकासंदर्भात) विचार करु तेव्हा पाहूयात काय होतं ते,” असं गांगुलीने म्हटलं आहे.
नक्की वाचा >> शास्त्री गुरुजी अन् धोनीही संघाची साथ सोडणार; विराटही देणार मोठा धक्का, टीम इंडियाचं कसं होणार?
“I understand that Rahul Dravid is not interested on a permanent basis as an Indian coach but we haven’t asked him specifically on this topic as of now.” – Sourav Ganguly (To The Telegraph)
— CricketMAN2 (@man4_cricket) September 13, 2021
भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी २० विश्वचषकानंतर संपत आहे. विश्वचषक स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. म्हणजेच शास्त्री हे केवळ दोन महिन्यांसाठी भारतीय संघासोबत आहेत. रवि शास्त्री यांना स्वत: आपला करार वाढवून घेण्याची इच्छा नसल्याची माहिती समोर येत आहे. अशा परिस्थितीमध्ये द्रविडवर संघाला प्रशिक्षण देण्याची आणि मार्गर्शन करण्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र द्रविडने यापूर्वीच आपण भारतीय संघाचे पुढील प्रशिक्षक नसल्याचं म्हटलं होतं. आपण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपली भूमिका पार पडत राहणार आहोत असं द्रविड म्हणाला होता.
नक्की वाचा >> “अपेक्षा आहे की येथे…”; मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर IPL साठी दुबईत दाखल झालेल्या विराट कोहलीचं मोठं वक्तव्य
या आधीही द्रविडने पार पाडलीय प्रशिक्षक म्हणून जबाबदारी
भारतीय क्रिकेट संघ जुलै महिन्यामध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेला होता तेव्हा राहुल द्रविड या दौऱ्यामध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून संघासोबत गेला होता. इंग्लंडविरोधात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी करण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माबरोबरच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रीसुद्धा या दौऱ्यावर गेले नव्हते. भारतीय संघातील प्रमुख खेळाडू वगळून शिखर धवनच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडूंचा संघ या दौऱ्यासाठी पाठवण्यात आलेला ज्याच्या प्रशिक्षणाची जबाबदारी द्रविडच्या खांद्यावर होती.
— Virat Kohli (@imVkohli) September 21, 2019
धोनी टी २० वर्ल्डकप पुरताच संघासोबत
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये संघासोबत मेंटॉर म्हणून जाणार आहे. मात्र धोनी केवळ या स्पर्धेपुरताच संघासोबत असणार आहे. धोनीला सपोर्टिंग स्टाफ म्हणून भारतीय संघासोबत दिर्घ काळ राहण्याची इच्छा नसल्याचं सांगण्यात आलं आहे. धोनी केवळ टी २० विश्वचषक स्पर्धेपुरता संघासोबत असणार आहे. धोनीने यापूर्वीच बीसीसीआयला यासंदर्भातील माहिती दिल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. भारताने आतापर्यंत सर्व टी २० विश्वचषक स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखालीच खेळल्या आहेत.
नक्की वाचा >> Ind vs Eng : “त्या गुन्ह्यासाठी रवी शास्त्री आणि कोहलीला अटक करा”; संतप्त भारतीयांची मागणी
भारतीय संघ पूर्णपणे बदलणार?
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार टी २० विश्वचषकानंतर विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील म्हणजेच टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा आहे. विराटला फलंदाजीवर लक्ष्य केंद्रित करायंच असल्याने तो कर्णधारपद सोडणार असल्याचं सांगण्यात येतंय. म्हणजेच टी २० विश्वचषकानंतर संपूर्ण भारतीय संघच बदललेल्या स्वरुपात पहायला मिळणार आहे. प्रशिक्षक रवि शास्त्रींसोबतच कोहलीही पद सोडणार असल्याने भारताला ऑन आणि ऑफ द फिल्ड नवीन नेतृत्व मिळणार आहे. रोहित शर्माकडे टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटमधील नेतृत्व दिलं जाण्याची चर्चा आहे. मात्र बीसीसीआयने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. रोहित शिवाय इतर कोणताही खेळाडू कर्णधारपदाच्या शर्यतीत नाहीय.