गेल्या काही दिवसांपासून भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचं कर्णधारपद यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीनं एका मुलाखतीमध्ये कर्णधारपदावरून बीसीसीआयसोबत झालेल्या चर्चेविषयी गंभीर खुलासेवजा आरोप केले होते. यावरून बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यामध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं उघड झालं होतं. या सर्व प्रकरणावर आता प्रत्यक्ष निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी खुलासा केला आहे. विराट कोहलीसोबत नेमकी काय चर्चा झाली होती, त्यावर विराट कोहलीनं काय उत्तर दिलं होतं आणि कर्णधारपदाचा निर्णय कसा घेतला गेला, याविषयी त्यांनी गंभीर दावे केले असून त्यावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीचा ‘तो’ दावा खोटा?

टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होताना आपण एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम राहू इच्छितो असं बीसीसीआयला सांगितलं होतं. पण एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेताना आपल्याशी चर्चा झाली नसल्याचा दावा विराट कोहलीनं केला होता. मात्र, चेतन शर्मा यांनी शुक्रवारी संध्याकाळी तो दावा खोडून काढला आहे.

“हा पूर्णपणे विराट कोहलीचा निर्णय होता. कुणीही विराटवर टी-२० चं कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकला नव्हता. एकदा त्यानं ते सोडल्यावर निवड समितीला विचार करावा लागला. कारण आम्हाला वाटत होतं की पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेट प्रकारासाठी (एकदिवसीय आणि टी-२०) एकच कर्णधार असावा. कारण त्यामुळे निवड समितीला इतर गोष्टींचं नियोजन करणं सोपं होतं. आम्ही त्याला याबाबत माहिती देखील दिली होती”, असं चेतन शर्मा यांनी शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

‘तो’ निर्णय निवड समतीचा होता!

एकदिवसीय संघासाठीही नव्या कर्णधाराची निवड करण्याचा निर्णय निवड समितीचा होता, असं चेतन शर्मा म्हणाले आहेत. “आमचा निर्णय झाल्यानंतर मी लगेच विराट कोहलीला फोन केला. ती कसोटी संघाच्या निवडीसाठीची बैठक होती. आम्हाला त्या मीटिंगमध्ये विराटला याबद्दल सांगायचं नव्हतं. म्हणून मीटिंग संपल्यानंतर मी विराटला फोन करून सांगितलं की निवड समितीला वाटतंय पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा. आमचं फार चांगलं संभाषण झालं”, असं चेतन शर्मा म्हणाले.

रोहित शर्माशी वाद, ‘वन डे’चं कर्णधारपद आणि BCCI सोबतची ‘ती’ चर्चा! विराट कोहलीचे खळबळजनक खुलासे!

विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये गैरसमज?

दरम्यान, विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये कोणताही गैरसमज झालेला नसल्याचं चेतन शर्मा म्हणाले. “बीसीसीआय, निवड समिती आणि खेळाडूंमध्ये कोणताही गैरसमज नाही. जेव्हा निवड समितीचा निर्णय होतो, तेव्हा तुम्ही थेट कर्णधारालाच तो सांगू शकता. मी एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. आमचा निर्णय होताच आम्ही विराटला सांगितलं. जेव्हा मीटिंग सुरू झाली, तेव्हा विराटनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. आम्हाला कधीही वाद नको होता”, असं त्यांनी सांगितलं.

“आम्ही विराटला म्हणालो, भारतीय क्रिकेटसाठी तरी…”

“जो कुणी त्या मीटिंगसाठी उपस्थित होता, त्या सर्वांनी विराटला टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचा करायला सांगितलं. वर्ल्डकप जवळ येत होता. त्यामुळे आम्ही विराटला म्हणालो, किमान भारतीय क्रिकेटसाठी तरी निर्णयाचा पुनर्विचार कर. ही चर्चा वर्ल्डकपनंतर व्हायला हवी होती. पण आम्ही विराट कोहली आणि त्याच्या निर्णयाचा सन्मान करतो”, असं शर्मा म्हणाले.

IND vs SA ODI Series : रोहित शर्मा मालिकेतून बाहेर ; केएल राहुल असणार कर्णधार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट भारतीय संघासाठी महत्त्वाचा खेळाडू

दरम्यान, चेतन शर्मा यांनी विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. “विराट हा भारतीय क्रिकेटसाठी फार महत्त्वाचा खेळाडू आहे. आख्खा संघ त्याच्याभोवती तयार होत आहे. त्यामुळे आमची इच्छा आहे की त्यानं भारतासाठी खेळत राहावं आणि धावा करत राहावं. आम्हाला फक्त टी-२० आणि एकदिवसीय संघासाठी एकच कर्णधार हवा होता. हा एक कठीण निर्णय होता, पण निवड समितीला असे कठीण निर्णय घ्यावे लागतात”, असं चेतन शर्मा म्हणाले.