आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करूनही शासनाच्या नोकरीमध्ये प्रथम श्रेणीची बढती न दिल्यामुळे शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहे. गेल्या वर्षांपासून प्रथम श्रेणीची बढती मिळेल, यासाठी सुहास प्रयत्नशील होता. पण या वर्षीही त्याचे नाव प्रथम श्रेणीच्या यादीत नसल्याने तो निराश झाला आहे.
सुहासने ‘मि. आशिया’ हा किताब जिंकल्यावर त्याला सरकारने महसूल विभागात द्वितीय श्रेणीची (नायब तहसीलदार) नोकरी दिली होती. त्यानंतर २०१२मध्ये सुहासने ‘मि. ऑलिम्पिया’ स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले, तर ‘मि. युनिव्हर्स’ स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर त्याने शासनदरबारी प्रथम श्रेणीची बढती मिळावी, यासाठी अर्ज केला होता. गतवर्षी पंजाब राज्याने प्रथम श्रेणी नोकरीचा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवला होता, पण त्यावेळी महाराष्ट्र शासनाने त्याला प्रथम श्रेणीची बढती देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या दोन वर्षांतील बढत्यांच्या यादीमध्ये सुहासचे नाव नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जर माझ्या कामगिरीची कदर होत नसेल, तर मला वेगळा विचार करावा लागेल, असे सुहास सांगतो.
याबाबत सुहास म्हणाला की, ‘‘मी क्रीडा मंत्र्यांसह बऱ्याच नेतेमेंडळींकडे दाद मागितली आहे, पण मला अजूनही प्रथम श्रेणीची बढती देण्यात आलेली नाही. जर कामगिरी करून सन्मान केला जात नसेल तर माझ्यापुढे सध्यातरी पर्याय नाही. सरकार जर माझ्या कामगिरीची दखल घेणार नसेल, तर इथे थांबण्यात काही अर्थ आहे का? गेल्या वर्षी मला आश्वासन दिले होते, पण ते हवेतच विरून गेले आहे. सध्या मला २-३ राज्यांनी प्रथम श्रेणीची नोकरी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाडूची पर्वा नसेल तर मी तिथे का जाऊ नये.’’
याबाबत क्रीडा मंत्री पद्माकर वळवी म्हणाले की, ‘‘सुहास जेव्हा ‘मि. आशिया’ हा किताब जिंकून आला तेव्हा त्याला द्वितीय श्रेणीची नोकरी थेट देण्यात आली होती. सध्याची त्याची कामगिरी ही प्रथम श्रेणीच्या नोकरीसाठी लायक आहे. पण हे निर्णय सचिव समिती किंवा मुख्यमंत्री समिती घेत असते. त्यासाठी काही तांत्रिक मुद्दे असतात आणि त्यानुसार त्याच्या बढतीची प्रक्रिया सुरू असेल. पण सध्याच्या बढतीच्या यादीमध्ये त्याचे नाव नाही. खेळाडूंचा सन्मान करण्यासाठीच या साऱ्या योजना बनवल्या गेल्या आहेत, पण धोरणात्मक अडचणींमुळे त्याची बढती अजूनपर्यंत झालेली नाही.’’