लंडन : रीस जेम्सच्या (एक गोल व एक गोलसाहाय्य) अप्रतिम कामगिरीच्या जोरावर चेल्सीने यूएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सामन्यात एसी मिलानवर ३-० अशी सरशी साधली. पॅरिस सेंट-जर्मेनला मात्र बेन्फिकाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. इ-गटातील पहिल्या दोन सामन्यांत मिळून केवळ एक गुण मिळवणाऱ्या चेल्सीने एसी मिलानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे होते. चेल्सीला २४व्या मिनिटाला कॉर्नर कीक मिळाली. यावर वेस्ली फोफानाने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात चेल्सीने आक्रमणावर अधिक भर दिला. ५६व्या मिनिटाला रीस जेम्सच्या साहाय्याने पिएर एमरीक-ऑबामियांगने गोल करत चेल्सीची आघाडी दुप्पट केली. त्यानंतर ६२व्या मिनिटाला जेम्सने केलेल्या गोलमुळे चेल्सीने हा सामना ३-० अशा फरकाने जिंकला.

दुसरीकडे, पॅरिस सेंट-जर्मेनला पोर्तुगीज संघ बेन्फिकाने १-१ असे बरोबरीत रोखले. २२व्या मिनिटाला लिओनेल मेसीने गोल करत पॅरिसला आघाडी मिळवून दिली. मात्र, ४१व्या मिनिटाला डॅनिलो परेराकडून झालेल्या स्वयंगोलमुळे बेन्फिकाने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. रेयाल माद्रिदने विजयी घोडदौड कायम ठेवताना शाक्तार डोनेस्कचा २-१ असा पराभव केला. अर्लिग हालंडच्या दोन गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने कोपेनहेगनवर ५-० अशी मात केली.