Chennai Super Kings Release Players List For IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेआधी होणाऱ्या लिलावाची तारीख समोर आली आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार मिनी ऑक्शनचे आयोजन १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत केले जाऊ शकते. तर १५ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ५ वेळा आयपीएलच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ आगामी मिनी ऑक्शनआधी संघात मोठे बदल करू शकतो. चेन्नईच्या रिलीज करण्यात येणाऱ्या संभावित खेळाडूंची यादी समोर आली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्जचा संघ आगामी हंगामाआधी विजय शंकर, दिपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, सॅम करन आणि सलामीवीर फलंदाज डेवोन कॉनव्हेला देखील रिलीज करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेल्या आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याच्या ९.७५ कोटी रूपयांची चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या पर्समध्ये भर पडणार आहे. जर चेन्नई सुपर किंग्ज संघाने या खेळाडूंना रिलीज केलं, तर मिनी ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंवर बोली लावण्यासाठी पर्समध्ये आणखी २५ कोटींची भर पडेल.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने सॅम करनला २०२३ मध्ये मोठी किंमत मोजून संघात स्थान दिलं होतं. पण तो नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. तर दुसरीकडे अनुभवी फलंदाज डेवोन कॉनव्हे देखील आपल्या फलंदाजीची छाप सोडू शकलेला नाही. यासह राहुल त्रिपाठी आणि दिपक हुड्डा यांचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी या खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. तर गेल्या हंगामात अन्कॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करण्यात आलेला एमएस धोनी या हंगामात खेळताना दिसणार की नाही, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हे त्याचं शेवटचं हंगाम असू शकतं, असं माध्यमातील वृत्तांमध्ये म्हटलं जात आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी असा होता चेन्नई सुपर किंग्जचा संघ:
एमएस धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनव्हे, राहुल त्रिपाठी, शेख रशिद, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, रवींद्र जडेजा, रचिन रवींद्र, आर अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दिपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, शिवम दुबे, खलिल अहमद, नुर अहमद, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मथिशा पथिराना