David Malan Breaks Suresh Raina Record: इंग्लंडमध्ये सध्या द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत फलंदाज धावांचा पाऊस पाडत आहे. या स्पर्धेत ओव्हल इनविंसिबल्स आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स या दोन्ह संघांमध्ये झालेल्या सामन्यात ओव्हल इनविंसिबल्स संघाकडून फलंदाजी करताना डेव्हिड मलानने दमदार खेळी केली. त्याने २४ चेंडूंचा सामना करत ३४ धावा चोपल्या. या ३४ धावांच्या खेळीसह त्याने टी- २० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एकाच देशासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाला मागे टाकलं आहे.
डेव्हिड मलान हा टी-२० क्रिकेटमधील आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. त्याने इंग्लंडमध्ये टी-२० क्रिकेटमधील २४० सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ३२.४५ च्या सरासरीने ६५५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि ४३ अर्धशतकं झळकावली आहेत. यासह त्याने एकाच देशासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात त्याने सुरेश रैनाला मागे टाकलं आहे. सुरेश रैनाच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये ६५५३ धावा करण्याची नोंद आहे. आता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
टी- २० क्रिकेटमध्ये एकाच देशासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण?
टी-२० क्रिकेटमध्ये एका देशासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने भारतात टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना २७८ डावात ४२.३७ च्या सरासरीने ९७०४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८ शतकं आणि ७४ अर्धशतकं झळकावली आहेत. विराटने आयसीसी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पण तो अजूनही आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहितच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये ८४३६ आणि यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या शिखर धवनच्या नावे ७६२६ धावा करण्याची नोंद आहे. तर या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या जेम्स विंसने २४३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ५३ अर्धशतकांच्या साहाय्याने ७३९८ धावा केल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये एकाच देशासाठी सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली- ९७०४ धाव , भारत
रोहित शर्मा- ८४३६ धावा, भारत
शिखर धवन- ७६२६ धावा, भारत
जेम्स विंस- ७३९८ धावा, इंग्लंड
डेविड मलान- ६५५५ धावा, इंग्लंड
सुरेश रैना -६५५३ धावा, भारत