नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर विश्वविजेतेपद गमवावे लागल्यामुळे विश्वनाथन आनंद निराश झाला आहे. त्याच्या सहकाऱ्यांच्या (सेकंड्स) तोंडातून चकार शब्दही निघत नाहीयेत. आनंदने आपली पत्नी अरुणा, मुलगा अखिल, सेकंड्स आणि व्यवस्थापकांसह शनिवारी हयात रिजेन्सी हॉटेलमध्ये अखेरची भेट घेतली. खाद्यपदार्थावर ताव मारल्यानंतर आनंदने आपल्या लढतीचे बारकाईने निरीक्षण केले. काही वेळा घडलेला हास्यविनोद वगळता, नीरव शांतता पसरली होती. प्रत्येक जण आनंदच्या पराभवातून सावरत होता. आनंदच्या पराभवामागचे अचूक कारण शोधण्यात सर्वच जण मग्न होते. आपल्याला सावरण्यासाठी थोडा वेळ हवा आहे, मी पुन्हा नक्कीच परतेन, असा निर्धार आनंदने व्यक्त केल्यावर सर्वाच्याच चेहऱ्यावर समाधानाची लकेर पसरली.
‘‘दोन आठवडय़ानंतर मी लंडन चेस क्लासिक स्पर्धेत खेळणार आहे. त्यानंतर मी दीर्घ विश्रांती घेऊन कुटुंबीयांसोबत वेळ घालवणार आहे. फेब्रुवारी महिन्यात मी झ्युरिक येथील स्पर्धेत खेळेन आणि त्यानंतर मी २०१४मध्ये होणाऱ्या आव्हानवीराच्या स्पर्धेत खेळण्यासाठी तयार आहे की नाही, याबाबतचा निर्णय घेईन,’’ असे निराश झालेल्या आनंदने सांगितले.
विश्वविजेतेपदाच्या लढतीत आनंदला मदत करणाऱ्या त्याच्या सेकंड्सचे चेहरे दिवस-रात्र काम केल्यामुळे पुरते कोमेजून गेले होते. आनंदच्या पराभवामुळे त्यांना नाराजी लपवता येत नव्हती. ‘‘फारच विचित्र परिस्थिती आमच्यावर ओढवली आहे. ११व्या डावासाठी आम्ही मेहनत घेत होतो. पण रविवारआधीच खेळ खल्लास झाला आहे. त्यामुळे आता यापुढे कोणतीही तयारी करण्याची गरज नाही,’’ असे पोलंडचा ग्रँडमास्टर राडेक वोजासेक याने सांगितले.
२००४मध्ये व्लादिमिर क्रॅमनिकविरुद्ध विश्वविजेतेपदाची लढत खेळणारा हंगेरीचा ग्रँडमास्टर पीटर लेको याला पराभवाचे दु:ख अवगत आहे. ‘‘विश्वविजेतेपदाची लढत प्रतिस्पध्र्यामधील सर्व ऊर्जा खर्च करणारी असते. पण एका गोष्टीचे मला समाधान वाटले. अनेक पालक आपल्या मुलांना ही लढत पाहण्यासाठी घेऊन आले होते. तिकिटे विकत घेऊन पहिल्या रांगेत बसून ते आपल्या मुलांना खेळातील बारकावे समजून सांगत होते. मी लहान असताना माझी आई मला स्पर्धेसाठी घेऊन जायची, ही आठवण त्या निमित्ताने पुन्हा जागी झाली,’’ असे पीटर लेकोने सांगितले.

Story img Loader