कधी कोणाचं नशीब कसं पालटेल हे अजिबात सांगता येत नाही असं सामान्यपणे म्हटलं जातं. मात्र एका क्रिकेटपटूसोबत मागील काही महिन्यांमध्ये अशाच काही घडामोडी घडल्या की काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय संघाचं कर्णधारपदावरुन तो थेट लष्करामध्ये मेजर पदावर रुजू झालाय.

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे वेगवान घडामोडी ज्या क्रिकेटपटूच्या आयुष्यात घडल्यात त्याचं नाव आहे, दिनेश चंडिमल. जानेवारी महिन्यामध्ये श्रीलंकन क्रिकेट संघाचा कर्णधार असणाऱ्या दिनेश चंडिमलकडून केवळ कर्णधार पद काढून घेण्यात आलं असं नाही तर त्याला थेट संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

तीन महिन्यांपूर्वीच दिनेश चंडिमलकडून श्रीलंकन संघाचे कर्णधार पद काढून घेण्यात आलं. त्यानंतर त्याला संघातूनही वगळण्यात आलं. मात्र एवढ्यानंतरही खचून न जाता चंडिमलने श्रीलंकन लष्कराची व्हॉलेंटीयर फोर्स जॉइन केली. तिथे तो चांगली कामगिरी करत आहे. राजधानी कोलंबोपासून १०० किलोमीटर दूर असणाऱ्या करंदेनिया येथे चंडिमल एका क्रिकेट मैदानाची पहाणी करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये चंडिमल हा श्रीलंकन लष्कराच्या गणवेशात दिसून येत आहे.

लष्करामध्ये मेजर पदावर असणाऱ्या चंडिमलला लष्करी गणवेश फारच छान शोभून दिसत आहे. श्रीलंकन निवड समितीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत काही महिन्यांपूर्वी कर्णधार असणाऱ्या चंडिमलला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या संघांमध्ये स्थान दिलं नाही आणि कर्णधार पदावरुन उचलबांगडी करण्याबरोबरच त्याला थेट संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. श्रीलंकन क्रिकेट संघ आतापर्यंतच्या आपल्या सर्वात वाईट कालावधीमधून जात आहे. असं असतानाही चंडिमलसारखा अनुभवी आणि चांगल्या खेळाडूला थेट संघाबाहेर बसवण्याच्या निवड समितीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेकांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासोबतच कामगिरीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला असेल तर केवळ चंडिमलचीच का गच्छंती झाली?, प्रश्न उपस्थित केल्याचं पहायला मिळालं होतं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये चंडिमलला चांगली कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चार खेळींमध्ये केवळ २४ धावा केल्या होत्या. तसेच मागील पाच कसोटी सामन्यांमध्ये केवळ एक अर्धशतक झळकावता आलं होतं. चंडिमल आता घरगुती क्रिकेट स्पर्धांमधून आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याची चर्चा श्रीलंकन क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे. असं असलं तरी सध्या चंडिमलचा लष्करी गणवेशामधील आत्मविश्वास त्याच्या चाहत्यांना दिलासा देणार आहे, हे ही तितकचं खरं आहे.