दिवाळीच्या निमित्ताने नवी मुंबईतल्या नेरुळ इथलं डी वाय पाटील स्टेडियम एका नव्या पर्वासाठी सज्ज झालं आहे. वूमन्स वर्ल्डकपचा श्रीलंका-बांगलादेश सामना या मैदानावर होत आहे. या लढतीच्या निमित्ताने क्रिकेट वर्ल्डकपच्या नकाशावर हे स्टेडियम येणार आहे. भारतीय संघ इथे दोन महत्त्वपूर्ण लढती खेळणार आहे. वर्ल्डकपची सेमी फायनल आणि फायनलही याच मैदानावर रंगणार आहे. मुंबई म्हटलं की वानखेडे किंवा सीसीआय ही मैदानं डोळ्यासमोर उभी राहतात. मात्र आता या मांदियाळीत नवी मुंबईतल्या या मैदानाची भर पडते आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरलं. १८ वर्षानंतर आरसीबीचं आयपीएल जेतेपदाचं स्वप्न साकार झालं. विराट कोहली हा आरसीबाचा चेहरा. सगळे हंगाम आरसीबीसाठी खेळणारा विराट हे निष्ठेचं अतुलनीय उदाहरण ठरावं. कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या कोहलीचं आयपीएल जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार का असं चित्र होतं. मात्र दमदार सांघिक कामगिरीच्या बळावर आरसीबीने जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. आरसीबीच्या या ऐतिहासिक यशानंतर बंगळुरूत मिरवणूक काढण्यात आली. मात्र ढिसाळ नियोजनामुळे या मिरवणुकीत चेंगराचेंगरी होऊन ११ चाहत्यांचा जीव गेला. या बातमीने सगळेच हळहळले. या घटनेची सविस्तर चौकशी करण्यात आली. संबंधितांवर कारवाईही होईल पण गेलेली माणसं परत येणार नाहीत. बंगळुरूवासीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असलेल्या घटनेचं कटू वास्तवात रुपांतर झालं.चिन्नास्वामी स्टेडियम परिसरात पुरेशी मोकळी जागा नसल्याचंही कारण समोर आलं. याचा परिणाम होऊन वूमन्स वर्ल्डकप साठी यादीत असूनही चिन्नास्वामी स्टेडियमच्या मॅचेस अन्यत्र खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटक सरकारकडून मंजुरी न मिळाल्याने बंगळुरूतले सामने अन्यत्र खेळवले जात आहेत.
बंगळुरूऐवजी केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथल्या ग्रीनफिल्ड स्टेडियमचा पर्याय विचारात घेण्यात आला. मैदान, खेळपट्टी आणि बाकी गोष्टी वेळेत तयार असतील अशी ग्वाही केरळ क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला दिली होती. मात्र आयसीसीने वूमन्स वर्ल्डकप व्हेन्यू म्हणून नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डीवाय पाटील स्टेडियची निवड केली. वर्ल्डकपचे सामने गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदूर, नवी मुंबई आणि कोलंबो इथे खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये नसेल तर सेमी फायनल आणि फायनलचा मुकाबला डीवाय पाटील स्टेडियमवरच खेळवण्यात येणार आहे.
नेरुळचं डीवाय पाटील स्टेडियम मुंबईपासून साधारणत:५० किमी अंतरावर आहे. हार्बर मार्गावरील नेरुळ आणि सीवूड्स दारावे स्थानकांपासून स्टेडियम गाठणं सोपं आहे. नवी मुंबई परिवहन सेवेच्या तसंच टीएमटी, केडीएमटी बसेसही आहेत. सायन पनवेल हायवे स्टेडियमच्या बाजूनेच जातो. डीवाय पाटील स्टेडियम हे डीवाय विद्यापीठ कॅम्पसमध्येच असल्यामुळे आतमध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत.
दोन प्रमुख कारणांमुळे आयसीसीने डीवाय पाटील स्टेडियमची निवड केली. वूमन्स फ्रेंडली व्हेन्यू अशी डीवाय पाटील स्टेडियमची ओळख आहे. लॉजिस्टिक्सच्या माध्यमातून स्टेडियमला जाणंयेणं सोयीचं आहे. वर्ल्डकपच्या काळात विविध संघ, सामनाधिकार-पंच, ब्रॉडकास्ट क्रू यांना सतत जा-ये करावी लागते. त्यादृष्टीने हे स्टेडियम सोयीचं होतं.
आयएएनएस वृत्तसंस्थेला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीवाय पाटील स्टेडियमवर आयोजित महिला क्रिकेट लढतींना चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. २०२३ वूमन्स प्रीमिअर लीग असो किंवा महिला क्रिकेट संघाचे सामने असोत- चाहत्यांनी नेहमीच सामन्यांना गर्दी केली आहे. फिफा U17 वूमन्स वर्ल्डकप आणि AFC वूमन्स एशिया कप स्पर्धेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला. महिला चाहत्यांना इथे सामना बघताना, येता जाताना त्रास जाणवत नाही. वूमन्स स्पोर्ट्स फ्रेंडली व्हेन्यू अशी डीवाय पाटील स्टेडियमची ओळख झाली आहे.
तिरुवनंतपुरम इथून देशभरात थेट फ्लाईट्सची अनुपलब्धता हा मुद्दा असल्यामुळे ग्रीनफिल्ड स्टेडियमचं नाव मागे पडलं. डीवाय पाटील स्टेडियमहून मुंबईतील विमानतळ तासाभरावर आहे. तिथून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण होतं. वर्ल्डकपचे काही सामने कोलंबोत होत आहेत. त्यादृष्टीने मुंबईचा विमानतळ गाठणं सोयीचं आहे.
क्षमता किती?
डीवाय पाटील स्टेडियमची क्षमता ४५,३०० एवढी आहे. यामध्ये व्हीआययपी बॉक्स तसेच कॉर्पोरेट बॉक्सचाही समावेश आहे.
पहिल्यावहिल्या आयपीएल फायनलचं ठिकाण
२००८ वर्षी आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला. या हंगामाची फायनल डीवाय पाटील स्टेडियमवरच खेळवण्यात आली. शेन वॉर्नच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ३ विकेट्सने नमवत जेतेपदावर नाव कोरलं.
मुंबई-चेन्नई जुगलबंदी
२०१० हंगामाची अंतिम लढतही याच मैदानावर झाली होती. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर २२ धावांनी विजय मिळवत जेतेपदाची कमाई केली होती.
अखिल भारतीय टी२० स्पर्धा
डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीतर्फे दरवर्षी ऑल इंडिया टी२० स्पर्धा आयोजित करण्यात येते. भारतासाठी खेळणारे अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळतात.
पावसाने घातला खोडा, वनडे गेली वाहून
२००९ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. सात सामन्यांची वनडे मालिका होती. सातवा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार होता. डीवाय पाटील स्टेडियमवरचा तो पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार होता. मात्र मैदानाचं नशीब काहीतरी वेगळंच होतं. फयान चक्रीवादळामुळे मुंबई परिसरात प्रचंड पाऊस पडला. पावसाचा जोर जराही कमी न झाल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. स्टेडियमच्या जवळच असलेल्या डोंगरावरून पावसाचे ढग बरसत असल्याचं चित्र टीव्हीवर दिसलं होतं. हा सामना रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने सात सामन्यांची मालिका ४-२ अशी जिंकली.
कॉन्सर्टचं ठिकाण
२०२४ मध्ये डीवाय पाटील स्टेडियमवर कोल्डपे कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. २०१७ मध्ये जस्टीन बिबरने स्टेडियममध्ये परफॉर्म केलं होतं.
डी वाय पाटील मैदानावर होणारे वूमन्स वर्ल्डकपचे सामने
श्रीलंका- बांगलादेश २० ऑक्टोबर
भारत- न्यूझीलंड २३ ऑक्टोबर
भारत- बांगलादेश २६ ऑक्टोबर
सेमी फायनल २९ ऑक्टोबर