इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना नॉटिंगहॅममध्ये झाला. या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला. जॉनी बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. या सामन्यात अनेक नवे विक्रम रचले गेले. नॉटिंगहॅम कसोटीत सीमारेषेपार गेलेल्या चेंडूंमधून एक हजाराहून अधिक धावा मिळाल्या. कसोटी क्रिकेटमधली अशी पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, २००४ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सिडनी कसोटीत सर्वाधिक ९७६ धावा चौकार-षटकारांच्या मदतीने मिळाल्या होत्या.

या कसोटीत एकूण एक हजार ६७५ धावा झाल्या. याआधी इंग्लंडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कोणत्याही कसोटी सामन्यात इतक्या धावा झाल्या नव्हत्या. कसोटी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक एक हजार ७२३ धावा करण्याचा विक्रम १९४८ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात झाला होता. त्यानंतर आता नॉटिंगहॅम कसोटीचा दुसरा क्रमांक लागत आहे.

हेही वाचा – ‘अशा’ पद्धतीने खर्च होणार आयपीएल माध्यम हक्क लिलावातून मिळालेले पैसे

एवढेच नाही तर कसोटी सामन्यात सर्वाधिक चौकार-षटकार मारण्याचा विक्रमही नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण २४७ वेळा (२२५ चौकार आणि २४ षटकार) चेंडू सीमारेषेपार गेला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ८० चौकार आणि ४ षटकार मारले, तर दुसऱ्या डावात ३६ चौकार आणि २ षटकार मारले. यजमान इंग्लंडने पहिल्या डावात ७३ चौकार आणि ६ षटकार मारले, तर दुसऱ्या डावात ३६ चौकार आणि १२ षटकार मारले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नॉटिंगहॅम कसोटी सामना जो रूट आणि जॉनी बेअरस्टोने गाजवला. जॉनी बेअरस्टोने केवळ ७७ चेंडूंमध्ये कसोटी शतक साजरे केले. कसोटी क्रिकेटमधील चौथ्या डावातील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वी, १९०२मध्ये गिल्बर्ट जेसॉपने ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या डावात ७६ चेंडूत शतक झळकावले होते. जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स यांनी १७९ धावांची भागीदारी केली. धावगतीनुसार कसोटीतील ही तिसरी वेगवान शतकी भागीदारी ठरली आहे.