गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात भारताच्या नीरज चोप्राने टोक्यो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याच्या या कामगिरीमुळे लोकांना भालाफेक या खेळाची नव्याने ओळख झाली. आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ९०.१८ मीटरच्या विक्रमासह आपल्या देशाला पहिले भालाफेक सुवर्णपदक मिळवून दिले. नीरज चोप्राने या कामगिरीबद्दल नदीमचे अभिनंदनही केले आहे.

दुखापतीमुळे भारताचा नीरज चोप्रा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. ८९.९४ मीटर ही नीरची वैयक्तीक सर्वोत्तम कामगिरी आहे. अर्शद नदीमने ९० मीटरचा टप्पा पार नीरजचा विक्रमही मोडला. नीरज-नदीम असो किंवा इतर कुणी भालाफेकपटू त्यांनी फेकलेला भाला हवेला भेदून ९० मीटरसारख्या अंतरापर्यंत कसा पोहचतो? असा प्रश्न पडतो. ‘गोल्ड मेडल स्टँडर्ड’ असलेल्या भालाफेकीत भौतिकशास्त्राची काय भूमिका आहे, हे जाणून घेणे फार रंजक आहे.

हेही वाचा – CWG 2022: ऊसाच्या मोळीच्या मदतीने ‘तिने’ गाठली राष्ट्रकुल स्पर्धा! कांस्य पदकाची कमाई करून घडवला इतिहास

भाला फेकण्याचा कोन असतो महत्त्वाचा

“कोणतेही प्रक्षेपण ४५ अंशाच्या कोनात प्रक्षेपित केले जावे, असे हायस्कूल पातळीवरील भौतिकशास्त्रात सांगितले आहे. मात्र, जेव्हा प्रक्षेपण आणि लक्ष्य एका समान उंचीवर असते तेव्हाच हा जास्त प्रभावीपणे लागू होतो. हेच सत्य आहे,” असे ट्वीट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथील कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स अँड मटेरियल सायन्स विभागातील प्राध्यापक डॉ. अर्णब भट्टाचार्य यांनी केले होते. त्यांनी स्पष्ट केले की, भालाफेकीमध्ये प्रक्षेपण जमिनीपासून साधारण दोन मीटरपेक्षा जास्त उंचीवरून होते आणि लक्ष्य जमिनीवर असते. त्यावेळी ३६ अंशाचा कोन तयार होतो. शिवाय यामध्ये वायुगतिशास्त्राच्या (एअरोडायनॅमिक्स) अनेक पैलूंचा समावेश होतो.

भाल्याची रचना सर्वात महत्त्वाची

मुख्य संकल्पना अशी आहे, की गुरुत्वाकर्षण केंद्र दाबाच्या केंद्राच्या पुढे साधारण चार सेंटीमीटर अंतरावर असावे. प्राध्यापक भट्टाचार्य यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “आधुनिक भालाफेकीच्या डिझाइनमध्ये ही गोष्ट आधीच अंगभूत आहे. भाल्याचा आकार आणि वजन वितरण अशा प्रकारे करण्यात आले आहे की गुरुत्वाकर्षण केंद्र आपोआप दाबाच्या केंद्राच्या पुढे येते. खेळाडू भाला फेकताना तो गुरुत्वाकर्षणाच्या केंद्राभोवती हाताची पकड ठेवतो”.

हेही वाचा – नीरज चोप्राने केले पाकिस्तानच्या खेळाडूचे अभिनंदन! आनंद महिंद्रा म्हणाले,”दोघांनाही…”

इतर महत्त्वाचे व्हेरिएबल्स

भाला फेकल्यानंतर सर्वप्रथम त्याचे टोक जमिनीवर आदळले पाहिजे, ही सर्वात प्राथमिक बाब आहे. त्यानंतर सुरुवातीचा रनअप, कोनीय संवेग, भाला हातातून सोडतानाचा वेग, उंची आणि कोन हे महत्त्वाचे घटक आहेत. असे मानले जाते, की एलिट थ्रोअरचा धावण्याचा वेग सरासरी जास्तीत जास्त पाच ते सहा मीटर प्रती सेंकद असतो. ते साधारण २८ते ३० मीटर प्रती सेंकद वेगाने भाला सोडतात.

प्राध्यापक भट्टाचार्य पुढे म्हणतात की, भालाफेकीमध्ये फेकण्याचा कोन, वाऱ्याची दिशा आणि वेग, हवेचे तापमान आणि घनता देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. ते म्हणाले, “कोणतीही वस्तू फेकण्यामागील भौतिकशास्त्राचा विचार केल्यास – भालाफेकसाठी ‘भाल्याचा हवेतून प्रवास’ हा महत्त्वाचा घटक आहे. कमी तापमान असलेली हवेमध्ये थोडी अधिक लिफ्ट मिळते. त्यामुळे थोडे अधिक अंतर गाठणे शक्य होते. सामान्य लोकांना ही अतिशय किरकोळ बाब वाटेल. पण, याबाबीमुळे कदाचित ऑलिंपक पदकही मिळू शकते”

भालाफेकीचे नियम

भाल्याचा आकार, किमान वजन, भाल्याचा गुरुत्वाकर्षण केंद्र, भाल्याचा पृष्ठभाग आणि फेकण्याची परवानगी असलेली तंत्रे या सर्व गोष्टी ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन’द्वारे नियंत्रित केल्या जातात. भालाफेक हा एक असा दुर्मिळ खेळ आहे ज्यामध्ये बदल करण्यासाठी आयएएएफने हस्तक्षेप केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भौतिकशास्त्राच्या आधारे भाल्यामध्ये आणखी काही बदल करता येतील का? असे विचारले असता प्राध्यापक भट्टाचार्य यांनी सांगितले, “आयएएएफने कार्यप्रदर्शन वाढण्याच्यादृष्टीने योग्य ते बदल केले आहेत. एअरोडायनॅमिक्स क्षेत्रातील तज्ज्ञांनी भविष्यात काही बदल सुचवले तर त्यांचा विचार होऊ शकतो.”