पीटीआय, सिडनी

ऑस्ट्रेलियातील मालिका पराभवात फलंदाजांचे आणि त्यातही रोहित शर्मा, विराट कोहली या प्रमुख खेळाडूंचे अपयश कारणीभूत होते. या दोघांचेही भवितव्य आता पूर्णपणे निवड समितीच्या हातात आहे, असे मत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.

‘‘ऑस्ट्रेलिायात जाण्यापूर्वी सर्व फलंदाज चांगल्या लयीत होते असे नाही. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेतही फलंदाजांचे अपयश संघाला भोवले होते. ऑस्ट्रेलियातील पराभवापेक्षा मायदेशात न्यूझीलंडच्या फिरकीसमोर भारताने तीनही कसोटी सामने हरणे ही सर्वात नामुष्कीची गोष्ट होती. तेव्हाही रोहित, विराट लयीत नव्हते. अशा वेळी भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणाऱ्या खेळाडूंना योग्य वेळी संधी मिळणार नसेल आणि वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याचे धाडस नसेल, तर अशी निवड समिती काय कामाची आहे,’’ असा संतप्त प्रश्न सुनील गावस्कर यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा >>>VIDEO: यत्र तत्र बुमराह; लॉकी फर्ग्युसनलाही आवरला नाही जसप्रीत बुमराहची अ‍ॅक्शन कॉपी करण्याचा मोह

‘‘या दोन्ही मालिकांनंतर आता रोहित आणि विराट यांचे भवितव्य अर्थातच निवड समितीच्या हातात आहे. सध्या तरी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीच्या वाटेवरून आपल्याला माघारी परतावे लागले आहे, याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे आणि हे निवड समितीने मनावर घ्यावे,’’ असे गावस्कर म्हणाले.

‘‘या मालिकेतील नऊ डावांत सहा वेळा आपण दोनशे धावाही करू शकलो नाहीत. सहा महिन्यांतील भारतीय फलंदाजीचे अपयश चिंताजनक होते. केवळ यामुळेच जे सामने आपण जिंकायला हवे होते, ते आपण गमावले. आता जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा (डब्ल्यूटीसी) नवा हंगाम सुरू होण्यास पुरेसा वेळ आहे या वेळात निवड समिती नव्या भारतीय संघाचा विचार करेल,’’ अशी अपेक्षाही गावस्कर यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>>Bumrah Konstas Fight: “हो माझी चूक होती…”, बुमराहशी मुद्दाम वाद घातल्याचे कॉन्स्टासने केलं मान्य; म्हणाला, “माझ्यामुळे ख्वाजा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नव्याने शोध आवश्यक

ऑस्ट्रेलियात नितीश कुमार रेड्डीची निवड केली हे योग्यच होते. असे अनेक खेळाडू सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करत आहेत. त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे. फलंदाजीत अपयशाचा फटका बसला, तसा गोलंदाजीत बुमरावर विसंबून राहणेही संघाला महागात पडेल असे सांगून गावस्कर म्हणाले,‘‘यामुळेच नव्या खेळाडूंचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे अनेक चांगले फलंदाज, गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे लक्ष जाण्याची गरज आहे. त्यामुळे संघातील अनुभवी खेळाडूंवर ताण पडणार नाही.’’