Gautam Gambhir on KL Rahul: टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल सध्या टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. अलीकडेच, टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने केएल राहुलबद्दल अनेक ट्विट केले होते. तसेच आकडेवारीचा हवाला देत म्हटले होते, की केएल राहुलला वगळण्याची वेळ आली आहे. त्यानंतर आकाश चोप्रा आणि हरभजन सिंगने केएल राहुलच्या समर्थनार्थ उतरले होते. आता गौतम गंभीरने केएल राहुलच्या टीकाकारांवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झगडत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (BGT) च्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येही त्याची बॅट शांत राहिली. त्याला उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये संघाचा उपकर्णधारपद देण्यात आलेले नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी तो संघाचा उपकर्णधार होता. गौतम गंभीरने केएल राहुलबाबत आपले मत मांडले आहे.
स्पोर्ट्स तकवर गंभीर म्हणाला, “जे लोक केएल राहुलबद्दल बोलत आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट किती कठीण आहे हे माहीत नाही. मला असे वाटते की, जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा त्याला अधिक पाठबळाची गरज असते. मला एका खेळाडूचे नाव सांगा, ज्याने नेहमीच धावा केल्या आहेत. प्रत्येक खेळाडूला समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण प्रतिभेला पाठबळ दिले पाहिजे.”
केएल राहुल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. व्यंकटेश प्रसाद आणि आकाश चोप्रा यांनी तर सोशल मीडियावर राहुलवरुन जाहीरपणे वाद घातला आहे. राहुलने बीजीटीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तीन डावांमध्ये अनुक्रमे २०, १७ आणि १ धावांची खेळी खेळली आहे. शुबमन गिल सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, परंतु असे असतानाही राहुलला कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात करण्याची संधी मिळत आहे.
शेवटच्या दोन कसोटींसाठी टीम इंडिया –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.