महत्त्वपूर्ण मालिकेआधी चांगला सराव होणे नेहमीच महत्त्वाचे असते. इराणी करंडक स्पर्धेत दमदार शतक झळकावल्यामुळे माझा सराव उत्तम झाला आहे, असे मत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले.
तो म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक जण या मालिकेची आतुरतेने वाट पाहत असते. या मालिकेसाठी माझी जय्यत तयारी झाल्याने मी आनंदी आहे,’’ असे सचिनने सांगितले. शेष भारताविरुद्ध सचिनने नाबाद १४० धावांची खेळी साकारून सुनील गावस्कर यांच्या प्रथम श्रेणीतील ८१ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
शतकी खेळीबद्दल सचिन म्हणाला, ‘‘खेळपट्टीशी जुळवून घेण्यासाठी मला वेळ लागला. चेंडूला मिळणारी उसळी, वेग आणि स्विंग याचा अंदाज घेण्यासाठी खेळपट्टीवर काही काळ थांबणे गरजेचे होते. दुसऱ्या चेंडूवर मी चौकार लगावला तरी मी काही वेळ खराब चेंडूची प्रतीक्षा करत होतो. मी फलंदाजीच्या शैलीत काहीसा बदल केला आहे. अंतर्मनाचा आवाज ऐकूनच मी हा बदल केला आहे. परिस्थिती बदलत गेली, तशी मी खेळी साकारली. एकाच वेगाने तुम्ही खेळ करू शकत नाहीत.’’