IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलं. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुक या जोडीने भारतीय संघावर चांगलाच हल्लाबोल केला. दोघांनी मिळून १५०–१५० धावांची खेळी केली. यादरम्यान दोघांमध्ये त्रिशतकी भागीदारी झाली. या भागीदारीच्या बळावर या जोडीने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ या जोडीने बर्मिंघममध्ये सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. याआधी हा रेकॉर्ड ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या नावावर होता. दोघांनी २०२२ इंग्लंड दौऱ्यावर सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी केली होती. या कसोटी सामन्यातही रवींद्र जडेजा आणि शुभमन गिलने २०३ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुक यांनी केलेली ३०३ धावांची भागीदारी या दोन्ही रेकॉर्डवर भारी पडली. आता बर्मिंघममध्ये सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड हा जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुक या जोडीच्या नावावर आहे.
यासह जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुकच्या नावावर आणखी २ मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. दोघांनी मिळून भारतीय संघाविरुद्ध सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यासह या जोडीने इंग्लंडकडून मायदेशात सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
इंग्लंडने केल्या ४०७ धावा
या डावात फलंदाजी करताना इंग्लंडकडून हॅरी ब्रुकने १५८ आणि जेमी स्मिथने सर्वाधिक १८४ धावांची खेळी केली. तर जो रूटने २२ आणि जॅक क्रॉलीने १९ धावांची खेळी केली. इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ तर आकाश दीपने ४ गडी बाद केले.