आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत नंबर-१ कसोटी अव्वलस्थान पटकावला आहे. आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी केली होती, ज्याचा त्याला ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. ३६ वर्षीय आर अश्विन २०१५ मध्ये प्रथमच नंबर-१ कसोटी गोलंदाज बनला आणि त्यानंतर तो या खुर्चीवर अनेकदा बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्याचवेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एका स्थानाच्या फायदा घेऊन चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रवींद्र जडेजानेही स्थान मिळवले असून, तो आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अशाप्रकारे ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत तीन भारतीय गोलंदाजांचा टॉप-१० मध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आहे.

आर. अश्विन हा ८६४ गुणांसह अव्वलस्थानी पोहोचला आहे. तसेच, जेम्स अँडरसन हा ८५९ गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे. यानंतर तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स ८५८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. सहाव्या क्रमांकावर इंग्लंडचा ओली रॉबिन्सन आणि सातव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आहे. न्यूझीलंडचा काईल जेमिसन ९व्या तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क १०व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी १८व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, जर आपण कसोटी अष्टपैलू रँकिंगबद्दल बोललो तर रवींद्र जडेजा आणि आर अश्विन अनुक्रमे नंबर-१ आणि नंबर-२ च्या सिंहासनावर विराजमान आहेत. अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

अनिल कुंबळेचा हा ‘विराट विक्रम’ अश्विन मोडेल

टीम इंडियाचा महान ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने तिसऱ्या कसोटी सामन्यात ९ विकेट घेतल्यास तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ११२ विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनुभवी लेगस्पिनर अनिल कुंबळेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ कसोटी बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विन तिसऱ्या कसोटी सामन्यात ९ विकेट्स घेतच अनिल कुंबळेचा हा विक्रम मोडेल.

अश्विन सर्वाधिक ५ बळी घेऊन इतिहास रचणार आहे

याशिवाय रविचंद्रन अश्विन भारतात खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ बळी घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेचा विक्रम मोडेल. रविचंद्रन अश्विनने भारतात खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २५ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत. अश्विन अजूनही या बाबतीत अनिल कुंबळेच्या बरोबरीने आहे. अनिल कुंबळेनेही भारतात खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये एकूण २५ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत. इंदोरमध्ये रविचंद्रन अश्विनने पुन्हा एकदा ५ विकेट्स घेतल्यास तो इतिहास रचेल. असे केल्याने २६ वेळा पाच विकेट घेणारा अश्विन इतिहासातील पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत ९० कसोटींच्या १७० डावांमध्ये ४६३ विकेट्स घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विनने ११३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५१ विकेट्स घेतल्या आहेत, तर ६५ टी२० मध्ये ७२ विकेट्स आणि आयपीएलच्या १८४ सामन्यांमध्ये १५७ विकेट्स घेतल्या आहेत.

हेही वाचा: IND vs AUS: जडेजाच्या नो बॉलने ‘गेम’ फिरवला! लाबुशेनला दोनदा जीवदान कसं पडलं महागात?

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज

१. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – ८०० कसोटी विकेट्स

२. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – ७०८ कसोटी विकेट्स

३. जेम्स अँडरसन (इंग्लंड) – ६८२ कसोटी विकेट्स

४. अनिल कुंबळे (भारत) – ६१९ कसोटी विकेट्स

५. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – ५७१ कसोटी विकेट्स

६. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) – ५६३ कसोटी विकेट्स

७. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – ५१९ कसोटी विकेट्स

८. नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) – ४६८ कसोटी विकेट्स

९. रविचंद्रन अश्विन (भारत) – ४६३ कसोटी विकेट्स

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc test ranking r ashwin wrested the crown from james anderson the number 1 bowler in tests avw
First published on: 01-03-2023 at 16:18 IST