Irfan Pathan On Team India Selection: भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये येत्या २ ऑक्टोबरपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी गुरूवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआयकडून) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंड दौऱ्यावर फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या मालिकेत युवा फलंदाज शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला संघात देण्यावरून माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मोठं वक्तव्य केलं आहे.
वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर इरफान पठाणने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोतलाना म्हणाला, “इंग्लंड दौऱ्यावर असताना जसप्रीत बुमराहचा वर्कलोड मॅनेज करण्यात आला. त्याला मालिकेतील सर्व सामने खेळण्याची गरज भासली नाही. या निर्णयात निवडकर्ते, संघ व्यवस्थापक आणि फिजिओ यांची महत्वाची भूमिका होती. त्याला एक सामना झाल्यानंतर पुढील सामन्यात विश्रांती दिली गेली आणि मग पुढील सामन्यात तो पुन्हा एकदा मैदानात उतरला. आता वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेत त्याचा वर्कलोड मॅनेज करण्याची चांगली संधी होती. भारतात तो तसंही फार गोलंदाजी करणार नाही, मग मालिकेतून विश्रांती दिली गेली असती तर काय फरक पडला असता? पण जर त्याने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. बुमराह कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत आहे ही चांगली गोष्ट आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “पण निवडकर्ते बुमराहला विश्रांती देऊन युवा वेगवान गोलंदाजाला संधी देऊ शकले असते. भारतीय संघाने वेगवान गोलंदाजांना तयार करण्यावर भर द्यायला हवा. ३-४ गोलंदाज असून काहीच होणार नाही. भविष्याचा विचार करता, कमीत कमी ८ वेगवान गोलंदाज असायला हवेत. हे चूक की बरोबर असा प्रश्न नाही. मी जर निवडकर्ता किंवा संघ व्यवस्थापकाचा भाग असतो तर मी युवा वेगवान गोलंदाजाला संधी दिली असती. त्याला तयार करण्यावर मी अधिक भर दिला असता. तो कशी कामगिरी करेल हा नंतरचा भाग आहे.”
वेस्टइंडिज दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव</p>