मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि महेद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सचिन आणि धोनी टेनिस कोर्टवर खेळताना दिसत आहेत. पण क्रिकेट सोडून ते टेनिस कोर्टवर का गेले याच्या मागचे नेमके कारण काय असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, यापूर्वी सचिन तेंडुलकर रोड सेफ्टी लीगमध्ये खेळताना दिसला होता. रोड सेफ्टी लीगमध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड्स यंदाचा चॅम्पियन बनला आहे.

आयसीसीचे सर्व चषक भारताला जिंकवून देणारा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनी आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर यांचा भारतात खूप मोठा चाहता वर्ग आहे. भारताव्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंची फॅन फॉलोइंग परदेशातही मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडेच धोनी यूएस ओपनचा आनंद लुटताना दिसला होता. आत्ताच निवृत्त झालेला खेळाडू रॉजर फेडरर बरोबर त्याची मैत्री ही सर्वश्रुत आहे. तो अनेक वेळा युएस खुली टेनिस स्पर्धा, विम्बल्डन अशा ठिकाणी तो सामना पाहायला गेला आहे.

खरंतर धोनी आणि सचिन हे दोन्ही भारतीय दिग्गज टेनिस कोर्टवर दिसत आहेत. हे दोघे एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी टेनिस कोर्टवर उतरले होते. यादरम्यान कोर्टवर सचिन आणि धोनीनं टेनिसचा आनंद लुटला. यंदाच्या विम्बल्डन नंतर महेंद्रसिंग धोनी यूएस ओपनचे सामने पाहण्यासाठी थेट न्यूयॉर्कला देखील पोहोचला होता. इतकच नाही तर टेनिस व्यतिरिक्त धोनी काही दिवसांपूर्वी गोल्फ कोर्सवर देखील दिसला होता. भारताचे महान कर्णधार कपिल देव यांच्यासह गोल्फ खेळतानाचा धोनीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.