IND vs BAN Match Highlights: हार्दिक पंड्याचे झंझावाती अर्धशतक आणि कुलदीप, बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारताने ५० धावांनी मोठी विजय मिळवला. एकंदरीतच भारतीय संघाच्या अष्टपैलू कामगिरीसह भारताने हा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे आणि सोबतच उपांत्य फेरीच्या दिशेने अजून एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, विराट कोहली, शिवम दुबे आणि रोहित शर्माच्या शानदार फटकेबाजीसह भारताने १९६ धावांचा डोंगर उभारला. हार्दिक पंड्या बांगलादेशविरूद्धच्या सामन्याचा सामनावीर ठरला.

१९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ केवळ १४६ धावाच करू शकला. भारताने दिलेल्या १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरूवात संथ झाली, पण त्यांनी विकेट्स गमावल्या नाहीत. हार्दिक पंड्याने भारताला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पंड्याने लिटन दासला १३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यादरम्यान नजमुल हुसेन शांतोने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर रिशाद हुसेनने २४ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, टीम इंडियासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग-जसप्रीत बुमराह यांनीही प्रत्येकी २ विकेट घेण्यात यश मिळविले. हार्दिक पांड्यालाही यश मिळाले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला हार्दिक पांड्या. पंड्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत जबरदस्त फलंदाजी करत २७ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने आपल्या डावात ४ चौकार आणि ३ षटकार मारले आणि १८५.१९ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. यानंतर पांड्याने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. पंड्यासोबतच ऋषभ पंतने २४ चेंडूत ३६ धावा आणि शिवम दुबेने २४ चेंडूत ३४ धावा करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. यानंतर गोलंदाजीत कुलदीप यादवने ४ षटकांत १० धावा देत ३ विकेट घेतले. जसप्रीत बुमराहनेही शानदार गोलंदाजी करत टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. बुमराहने ४ षटकांत केवळ १३ धावा दिल्या आणि २ विकेट घेतले.

भारताची वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत ४९ सामने खेळले आहेत. या कालावधीत ३३ सामने जिंकले आहेत तर १५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेच्या संघाच्या बरोबरीने पोहोचली आहे. श्रीलंकेने टी-२० विश्वचषकात आतापर्यंत ३३ सामने जिंकले आहेत. टीम इंडियाची आता हा विक्रम मोडत आपल्या नावे करण्यावर नजर आहे.