Rohit Sharma- Travis Head Memes: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे सामना पर्थमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. ही खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. या गोष्टीचा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने षटकं कमी करण्यात आली होती. २६ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाने ९ गडी बाद १३६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरूवात करता आली नाही.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडची जोडी मैदानावर आली. या जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आली नाही. भारताकडून पहिले षटक मोहम्मद सिराजने टाकले. तर दुसरे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला. अर्शदीप सिंगने या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने ट्रॅव्हिस हेडला बाद करत माघारी धाडलं. हेड अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. दरम्यान हेड बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर रोहित शर्माची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेपर्यंत रोहित शर्मा हा भारतीय वनडे संघाचा कर्णधार होता. रोहित शर्मा कर्णधार असताना जेव्हा जेव्हा भारत- ऑस्ट्रेलिया सामना झाला आहे. तेव्हा ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियासाठी खंबीरपणे उभा राहिला आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी करून भारताविरूद्ध विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेतही त्याने भारतीय संघाविरूद्ध खेळताना शतकी खेळी केली होती आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. आता गिल वनडे संघाचा कर्णधार आहे. ट्रॅव्हिस हेड स्वस्तात माघारी परतल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

भारतीय संघाने केल्या १३६ धावा

या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा अवघ्या ८, शुबमन गिल १०, विराट कोहली ० आणि अक्षर पटेल ३१ धावा करत माघारी परतले. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. तर शेवटी नितीश कुमार रेड्डीने नाबाद १९ धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात २६ षटकांअखेर ९ गडी बाद १३६ धावा केल्या.