India vs Australia 1st ODI Weather Update: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन हात करण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना १९ ऑक्टोबरला पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट चाहते ही मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. कारण ८ महिन्यांच्या विश्रांतीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी मैदानावर पुनरागमन करताना दिसणार आहे. मात्र, या सामन्याआधी हवामानाने भारतीय क्रिकेट चाहत्यांचं टेंशन वाढवलं आहे.

भारत- ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना रद्द होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. अॅक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार,रविवारी (१९ ऑक्टोबर) पर्थमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही ६३ टक्के इतकी असणार आहे. तर सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ३६ टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे पावसामुळे सामना थांबू शकतो.

नाणेफेक बजावणार महत्वाची भूमिका

ठरलेल्या वेळेनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ८:३० वाजता होईल. पण जर पावसाने हजेरी लावली. तर नाणेफेकीची वेळ मागे पुढे होऊ शकते. या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण सुरूवातीला या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे फलंदाज अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

पर्थच्या ऑप्टस मैदानावर ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. या मैदानावर खेळताना ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर ३ वनडे सामने खेळले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने विजयाची नोंद केली आहे.

वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल