India set a target of 400 runs in front of the Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाच्या शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर स्मिथचा निर्णय चुकीचा ठरवला. या दोघांनीही शतकं झळकावली. त्याचबरोबर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव जोरदार फटकेबाजी केल्यामुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ४०० धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर ४०० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ५गडी गमावून ३९९धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमधली ही भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च धावसंख्या ३८३धावा होती, जी त्यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये बंगळुरूमध्ये केली होती. त्याचवेळी, एकूण वनडेमधली ही भारताची सातवी सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या ४१८/५ आहे, जी त्यांनी डिसेंबर २०११ मध्ये इंदूरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. इंदूरच्या मैदानावर ही भारताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
प्रथम श्रेयस अय्यरने झळकावले शतक –
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८६ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वनडे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले. तो शतकानंतर १०५ धावा काढून बाद झाला. त्याने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.
दुसऱ्या विकेटसाठी २००धावांची भागीदारी –
मार्चमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस क्रिकेटपासून दूर होता. यानंतर त्याने नुकतेच आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन केले, मात्र दोन सामने खेळल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. मात्र, आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. श्रेयसने शुबमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी २००धावांची भागीदारी केली.
शुबमन गिलनेही झळकावले शतक –
श्रेयस अय्यरनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शुबमन गिलची जादू पाहायला मिळाली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक आणि एकूण नववे शतक ९२ चेंडूत झळकावले. वनडेतील सहा शतकांव्यतिरिक्त त्याने कसोटीत दोन शतके आणि टी-२० मध्ये एक शतक झळकावले आहे. ३३ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २३० धावा आहे. शुबमन ९२ चेंडूत १०० धावा तर केएल राहुल ९ धावांवर फलंदाजी करत आहे. तत्पूर्वी, श्रेयस अय्यर ९० चेंडूत १०५ धावा करून बाद झाला.
अखेरच्या टप्प्यात सूर्यकुमार यादवची वादळी खेळी –
केएल राहुलने ३८चेंडूत ५२ धावांची खेळी केली. त्याचवेळी इंदूरमध्ये अखेर सूर्यकुमार यादवचे वादळ पाहायला मिळाले. त्याने ३७ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्याचबरोबर रवींद्र जडेजा १३ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये २४चेंडूत ४४ धावांची भागीदारी झाली. भारताने शेवटच्या पाच षटकात ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जोश हेझलवूड, शॉन अॅबॉट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक विकेट मिळाली.