भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जात आहे. दिल्लीत सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या देशांसाठी घातक असणाऱ्या जडेजा-अश्विन जोडीने कांगारूंना अक्षरशः घाम फोडला. त्यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज कत्थक करताना दिसले. दुसऱ्या डावात ११३ धावांवर ऑस्ट्रेलिया डाव आटोपला आणि विजयासाठी ११५ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या ती केवळ एक धावेने कमी होती. यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवसअखेपर्यंत १ बाद ६१ धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. त्यांच्याकडे ६२ धावांची आघाडी होती. ट्रॅव्हिस हेड (४० चेंडूंत ३९) आणि मार्नस लाबुशेन (१९ चेंडूंत १६) यांनी तिसऱ्या दिवशी खेळायला सुरुवात केली. कालच्या धावसंख्येत अवघ्या ४ धावांची भर घालत ऑस्ट्रेलियाची विकेट्स पडायला सुरुवात झाली. ट्रेविस हेड ४३ धावा करून तर लाबुशेन ३५ धावा करून बाद झाला. इतर कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाला साधी २ आकडी धावसंख्या ही गाठता आली नाही.

आजचा दिवस सुरु होताना आर अश्विनने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेतली आणि त्यानंतर रवींद्र जडेजासोबत मिळून कागांरूंची दाणादाण उडवली. या दोघांमुळे भारताने हॅट्रीक साजरी केली. २२व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अश्विनने विकेट घेतली आणि त्यानंतर जडेजाने २३व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाने १ धावेत ४ विकेट्स गमावल्या. ९५ धावांवर पहिल्यांदा रेनशाॅला अश्विनने बाद केले आणि त्याच्या पुढच्या दोन चेंडूवर जडेजाने पीटर हंड्स्कॉम्ब आणि कर्णधार पॅट कमिन्सला बाद केले. ऑस्ट्रेलिया केवळ २० षटके खेळून ५२ धावांची भर घालू शकला. जडेजाने ४२ धावा देत तब्बल ७ विकेट्स घेतल्या. कसोटी सामन्यात त्याने १२ वेळा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

तत्पूर्वी, अष्टपैलू अक्षर पटेल (११५ चेंडूंत ७४ धावा) आणि रविचंद्रन अश्विन (७१ चेंडूंत ३७ धावा) यांनी आठव्या गडय़ासाठी केलेल्या ११४ धावांच्या निर्णायक भागीदारीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुनरागमन केले. भारताने पहिल्या डावात ८३.३ षटकांत २६२ धावा केल्या.

भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध अडचणी येत असताना पहिल्या कसोटीत ८४ धावांची खेळी करणारा अक्षर आणि अश्विन यांनी आक्रमक फलंदाजी केली. अक्षरने मॅथ्यू कुहनेमनविरुद्ध षटकार मारत आपले दुसरे अर्धशतक झळकावले. आपल्या खेळीदरम्यान पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर त्याने चांगले फटके मारले. ही भागीदारी अखेर कमिन्सने (१/४१) मोडीत काढली. सुरुवातीच्या सत्रात फलंदाजांच्या पडझडीनंतर विराट कोहली (८४ चेंडूंत ४४ ) आणि जडेजा (७४ चेंडूंत २६) यांना पाचव्या गडय़ासाठी ५९ धावांची भागीदारी रचली. मात्र, मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी दोघांनाही माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत पोहोचवले. हे दोघेही माघारी परतल्यानंतर केएस भरतलाही (६) अधिक काही करता आले नाही.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७८.४ षटकांत सर्वबाद २६३

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव): ३१. षटकात सर्वबाद ११३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत (पहिला डाव) : ८३.३ षटकांत सर्वबाद २६२