scorecardresearch

IND vs AUS 2nd Test: दिल्लीचे मैदान मारण्यासाठी टीम इंडियाचा सज्ज! कांगारूंशी दोन हात करण्यासाठी रोहितची काय असेल रणनीती?

India vs Australia: भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला पुनरागमन करायचे आहे. सध्या टीम इंडिया मालिकेत १-०ने पुढे आहे. त्यात रोहितसेना विजयी आघाडी कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.

IND vs AUS 2nd Test: India will set out to take an unbeatable lead, know when and where and how to watch live telecast of the match
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

India vs Australia 2nd Test Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) दिल्ली येथे खेळला जाईल. अरुण जेटली स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा ऑस्ट्रेलिया संघाचा प्रयत्न असेल. नागपूर येथील पहिल्या कसोटीत पराभूत व्हावे लागल्यानंतर, ऑस्ट्रेलिया संघ या कसोटीसाठी आपल्या संघात बदल करताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने याबाबतचे सूचक वक्तव्य केले आहे.

चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले होते. यजमान संघाने अवघ्या तीन दिवसात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूं पुढे नांग्या टाकल्याने त्यांना हा पराभव पत्करावा लागला. दिल्ली कसोटीआधी बोलताना ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने संघात बदल होण्याची हिंट दिली. त्याने मधल्या फळीतील फलंदाज ट्रेविस हेडबद्दल बोलताना म्हटले,“हेड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याची मागील वर्षातील कामगिरी उत्कृष्ट होती. त्याचा संघात समावेश करण्याबाबत आमची चर्चा सुरू आहे ‌”

हेड सध्या जागतिक कसोटी फलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. नागपूर कसोटीत त्याला वगळून मॅट रेनशॉ याला संधी दिल्याने अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच कमिन्स याने अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याच्या विषयी देखील आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “वॉर्नरची भारतातील फॅन फॉलाईंग मोठी आहे. ज्यावेळी तो त्याच्या फॉर्ममध्ये येतो तेव्हा तो गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो. आम्ही या खेळपट्टीबद्दल फारसे काही बोलू इच्छित नाही. मात्र, येथे देखील चेंडू वळण घेताना नक्कीच दिसेल.”

भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला नागपूर कसोटीत खेळता आले नव्हते आणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी दाखल झाला होता. आता तो पूर्णपणे फिट होऊन दिल्ली येथे होणाऱ्या कसोटीसाठी संघात परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेलाही अय्यरला मुकावे लागले होते. नागपूर कसोटीत अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने कसोटीत पदार्पण केले होते. मात्र आता श्रेयस अय्यरची प्लेइंग इलेव्हनमधील जागा निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा: Prithvi Shaw: ‘सेल्फीसाठी एकमेकांचे गळे…’ भररस्त्यात पृथ्वी शॉ अन् महिला फॅनची बाचाबाची, Video व्हायरल

सामना कधी कुठे कसा?

भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० पासून सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच ९ वाजता नाणेफेक होईल. थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर पाहता येईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 20:05 IST
ताज्या बातम्या