Joe Root, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये बर्मिंघमच्या मैदानावर दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला आहे. शुबमन गिलच्या द्विशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या आहेत. यादरम्यान गिल आणि वॉशिंग्टन सुंदरने महत्वपूर्ण भागीदारी केली.
या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलेला आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सुंदरला आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. ही जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली. त्याने या डावात फलंदाजी करताना १०३ चेंडूंचा सामना करत ४२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने शुबमन गिलसोबत मिळून १४४ धावांची भागीदारी केली. दरम्यान सुंदरला बाद करण्यासाठी जो रूटने भन्नाट चेंडू टाकला. ज्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वॉशिंग्टन सुंदरने या डावात फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलच प्रत्युत्तर दिलं. वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचे चेंडू त्याने चांगल्याप्रकारे खेळून काढले. पण, तो जो रूटच्या जाळ्यात अडकला. तर झाले असे की, इंग्लंडकडून १३९ वे षटक टाकण्यासाठी जो रूट गोलंदाजीला आला. या षटकातील चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर बाद होऊन माघारी परतला. रूटने डावखुऱ्या हाताच्या वॉशिंग्टन सुंदरला राऊंड द विकेटचा मारा सुरू ठेवला. रूटने मिडल स्टंपला चेंडू टाकला. जो टप्पा पडून सरळ राहिला. वॉशिंग्टन सुंदरची बॅट चेंडूपर्यंत पोहोचणार, इतक्यात चेंडू स्टंपला जाऊन धडकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने उभारला ५८७ धावांचा डोंगर
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज केएल राहुल अवघ्या २ धावांवर माघारी परतला. तर यशस्वी जैस्वालने ८७ धावांची खेळी केली. करूण नायरने ३१ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिलने सर्वाधिक २६९ धावांची खेळी केली. ऋषभ पंतने २५, रविंद्र जडेजाने ८९ आणि वॉशिंग्टन सुंदरने ४२ धावांची खेळी केली.