Yashasvi Jaiswal scored the third century of his Test career : राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यांच्या दुसऱ्या डावात सलामीवीर यशस्वी जैस्वालने मार्क वूडला चौकार ठोकत तिसरे कसोटी शतक झळकावले. त्याने १२२ चेंडूचा सामना करताना ९ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने शतक झळकावले. त्याचवेळी भारतीय संघाची धावसंख्या १ बाद १५८ अशी आहे. अशा प्रकारे टीम इंडियाची आघाडी २८४ धावांवर पोहोचली आहे.
याआधी इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला होता. भारताने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे टीम इंडियाला पहिल्या डावाच्या आधारे १२६ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या १९ धावा करून बाद झाला. मात्र यानंतर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी इंग्लिश गोलंदाजाविरुद्ध दमदार फटकेबाजी केली. दोन्ही फलंदाजांनी सहज धावा केल्या. विशेषतः यशस्वी जैस्वाल वनडे स्टाइलमध्ये फटकेबाजी केली.
इंग्लंडचा पहिला डाव –
सलामीवीर बेन डकेटने इंग्लंडकडून पहिल्या डावात १५३ धावांची शानदार खेळी केली. मात्र यानंतर उर्वरित इंग्लिश फलंदाजांनी निराशा केली. झॅक क्रॉऊली, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स आणि बेन फोक्ससारखे फलंदाज स्वस्तात बाद झाले. भारताकडून मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने ४ फलंदाजांना बाद केले. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या. जसप्रीत बुमराह आणि रवी अश्विनने १-१ इंग्लिश फलंदाजांना बाद केले.