IND vs NZ Virat Kohli 50th Centuary : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने बुधवारी (१५ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं ५० वं शतक ठोकलं. यासह विराटने भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडीत काढले. या सामन्यानंतर कोहलीने त्याच्यासाठी हा क्षण स्वप्नाहून सुंदर असल्याचं म्हटलं आहे. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या दोन आवडत्या व्यक्तींची नावं घेतली. विराट म्हणाला, “आज सचिन पाजी (पंजाबी भाषेत मोठा भाऊ) मैदानात होते, इतक्या महान आणि माझ्यासाठी प्रेरणास्थान असलेल्या व्यक्तीनं माझं कौतुक करणं हे माझ्यासाठी सर्वकाही आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचेन.

विराट कोहली म्हणाला, “माझा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि तेव्हा मला हे (५० वं शतक) साध्य करणं शक्य झालं हे माझ्यासाठी खूप काही आहे.” तसेच यावेळी विराटने त्याच्या पत्नीचा म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचादेखील उल्लेख केला. विराट म्हणाला की, माझी आयुष्याची जोडीदार, ज्या व्यक्तीवर माझं सर्वात जास्त प्रेम आहे, ती अनुष्का आज मैदानात होती. तिच्यासमोर मला इतकं खेळता आलं, हे माझ्यासाठी खूप खास होतं. आज सगळं काही जुळून आलं होतं. वानखेडेचं मैदान, उत्साही प्रेक्षक, माझं प्रेम आणि माझा आदर्श यांच्यासमोर मला मिळालेलं यश हे स्वप्नवत आहे.

विराट कोहलीने त्याचं शतक पूर्ण केल्यानंतर स्टेडियममध्ये बसलेला त्याचा आदर्श म्हणजेच सचिन तेंडुलकरला अभिवादन केलं. तसेच दुसऱ्या स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्का शर्माकडे पाहून फ्लाईंग किस केलं. अनुष्कानेही त्याला फ्लाईंग किस करून प्रतिसाद दिला. यासह विराट आणि अनुष्काची आणखी एक गंमतीदार गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे ही वाचा >> विराटच्या ५० व्या शतकावर सचिनची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “तेव्हा सर्वांनी तुझी फिरकी घेत, माझ्या पायाला स्पर्श…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये परतला. वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाची ड्रेसिंग रूम जिथे आहे, त्याच्या वरच्या स्टँडमध्ये अनुष्का शर्मा बसली होती. विराट ड्रेसिंग रूममधून अनुष्काला पाहण्याचा प्रयत्न करत होता. अनुष्काला पाहण्यासाठी विराटची चाललेली धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. परंतु, विराट आणि अनुष्का दोघेही एकमेकांना पाहू शकले नाहीत. विराट कोहलीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी समाजमाध्यमांवर अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. “हे जोडपं किती गोड आहे”, अशी एक प्रतिक्रिया एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाली.