आतापर्यंत टी २० मध्ये जे कोणालाच जमलं नाही ते रिझवान आणि बाबर आझमने करुन दाखवलं; नोंदवला अनोखा विक्रम

भारताचा कर्णधार विराट विराटनेही सामना संपल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि पाकिस्तानी कर्णधार बाबार आझमचं अभिनंदन केल्याचं चित्र पहायला मिळालं

Pakistan captain Babar Azam and opener Mohammad Rizwan
विराटनेही सामना संपल्यानंतर या दोघांचं अभिनंदन केलं.

फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका भारताला बसला. टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. मात्र त्याचबरोबर एकही विकेट न गमावता पाकिस्तानला विजय मिळवून देणाऱ्या मोहम्मद रिझवान आणि बाबार आझमने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केलाय.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. हा एक विक्रम ठरला. २०२१ या वर्षामध्ये जगातील कोणत्याच संघाच्या दोन फलंदाजांना हा पराक्रम करता आलेला नाही. विराटनेही सामना संपल्यानंतर या दोघांचं अभिनंदन केल्याचं पहायला मिळालं.

यापूर्वी चार वेळा शतकी भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांचा सामावेश आहे. तसेच न्यूझीलंडचा फलंदाज मार्टीन गुप्टील आणि के. विल्यमसन यांनीही आतापर्यंत चार वेळा शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. मात्र एका वर्षात चार वेळा हा पराक्रम करणारे रिझवान आणि बाबर हे पहिलेच खेळाडू ठरलेत.

कोहलीची खेळी व्यर्थ…
प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावाच करता आल्या. रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तात माघारी पाठवले. तसेच सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मात्र कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू शादाब खानने ऋषभला बाद केले. कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. त्यामुळे भारताला जेमतेम १५० धावांचा टप्पा पार करता आला. भारताचा कर्णधार विराट कोहलीचे (५७) झुंजार अर्धशतक व्यर्थ ठरले.

कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत अखेरची टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. यापूर्वी भारताने टी-२० विश्वचषकातील पाचही विजय महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. २०१७च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत भारताला कोहलीच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आताच्या पराभवामुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावरही चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी भारताने दोन्ही विश्वचषकात पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले होते. भारताने त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात सात (१९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५, २०१९) आणि टी-२० विश्वचषकात पाच (२००७मध्ये दोन वेळा, २०१२, २०१४, २०१६) सामने जिंकले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs pak 4th 100 plus partnership between babar azam mohammad rizwan in t20is in 2021 no other pair has scored more than two in a calendar year scsg

ताज्या बातम्या