India vs South Africa 1st Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे होणार आहे. टीम इंडियाने यापूर्वी कधीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहास रचण्यासाठी उतरणार आहे. २०२१-२२ मध्ये १-०ने आघाडी घेतल्यानंतरही टीम इंडियाने कसोटी मालिका २-१ने गमावली. दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित शर्मा २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता. २०११च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर २०१३मध्ये जेव्हा टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा तो सलामीचा फलंदाज होता. त्यानंतर भारताने आतापर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. २०२३मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दोन फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. या कसोटी मालिकेत भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. मात्र, मोहम्मद शमीच्या अनुपस्थिती टीम इंडियाला नक्कीच जाणवू शकते. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आपण जाणून घेऊ या.

दक्षिण आफ्रिकेत भारतीय फलंदाजांची कामगिरी

सध्याच्या संघात समाविष्ट असलेल्या फलंदाजांमध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने आफ्रिकन भूमीवर सात कसोटींत १४ डावांत ५१.३५च्या सरासरीने ७१९ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत कोहलीची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या १५३ धावा आहे. त्याचवेळी, के.एल. राहुलने पाच कसोटी सामन्यांच्या १० डावात २५.६०च्या सरासरीने २५६ धावा केल्या आहेत. १२३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. राहुलने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेत चार कसोटी सामन्यांच्या आठ डावात १५.३७ च्या सरासरीने १२३ धावा केल्या आहेत. त्याने एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेले नाही.

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर आहे. त्याने १५ कसोटी सामन्यांच्या २८ डावात ४६.४४च्या सरासरीने ११६१ धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. १६९ धावा ही सचिनची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसर्‍या स्थानावर टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (२२ डावात ६२४ धावा) आहेत. त्यांनी आफ्रिकेत एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होती. १४८ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लक्ष्मण ५६६ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी

सध्याच्या भारतीय संघात जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने सहा कसोटीत २६ विकेट्स घेतल्या असून ४२ धावांत पाच विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरने आफ्रिकेतील तीन कसोटी सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. आफ्रिकेत अश्विनच्या नावावर १० तर जडेजाच्या नावावर सहा विकेट्स आहेत. मोहम्मद सिराजने दोन कसोटीत तीन विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी शमीचाही या संघात समावेश होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला मालिकेतून बाहेर व्हावे लागले. शमीने आठ कसोटीत ३५ विकेट्स घेतल्या आहेत. २८ धावांत पाच विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

हेही वाचा: IPL 2024पूर्वी कोलकाता, लखनऊ, हैदराबाद संघांना मोठा धक्का; अफगाणिस्तान बोर्डाने ‘या’ तीन खेळाडूंवर लीग खेळण्यास घातली बंदी

दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. त्याने १२ कसोटीत ४५ विकेट्स घेतल्या आहेत. ५३ धावांत सहा विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. याबरोबरच जवागल श्रीनाथ आठ कसोटीत ४३ विकेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. ७६ धावांत सहा विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. शमी तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर झहीर खान चौथ्या स्थानावर आहे. त्याने ३० विकेट्स घेतल्या होत्या. झहीरची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी म्हणजे ६२ धावांत चार विकेट्स आहे. भारताचा आणखी एक वेगवान श्रीसंत २७ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे. यानंतर बुमराहचा क्रमांक लागतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 1st test from rohit to kohli how did indian test players perform in africa find out avw
First published on: 26-12-2023 at 13:35 IST