scorecardresearch

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : गिल की सूर्यकुमार?, भारत-ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना आजपासून

रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या इतिहासात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले असले, तरी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आता त्याला सर्वात अवघड परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

sp rohit sharma cummins

पीटीआय, नागपूर : रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या इतिहासात स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले असले, तरी कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आता त्याला सर्वात अवघड परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉर्डर-गावस्कर’ करंडकासाठी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होणार असून कर्णधार रोहित, तसेच भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांवर सर्वाचे लक्ष असेल. नागपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत जायबंदी श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया या जागतिक क्रिकेटमधील बलाढय़ संघांतील कसोटी सामने नेहमीच चुरशीचे होतात. मात्र, यंदाच्या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला चारपैकी किमान दोन सामने जिंकावे लागणार आहेत. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच दोन विषयांवर बरीच चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. खेळपट्टय़ा फिरकीला अनुकूल असणार का? आणि भारतीय संघ पहिल्या कसोटीत आक्रमक सूर्यकुमार आणि लयीत असलेला गिल यांच्यापैकी कोणाला पसंती देणार? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सामन्याच्या दिवशीच मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजीची भिस्त नेथन लायनवर असून त्याची लय बिघडवण्यासाठी भारताने त्याच्याविरुद्ध आक्रमक शैलीत खेळणे गरजेचे असल्याचे क्रिकेट जाणकारांचे मत आहे. त्यामुळे सूर्यकुमारला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता वाढते; परंतु गेल्या काही काळात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या क्रिकेटच्या तीनही प्रकारांत शतके झळकावणाऱ्या गिलकडेही भारतीय संघ व्यवस्थापनाला दुर्लक्ष करता येणार नाही. 

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी बरीच तयारी केली आहे. भारताला त्यांच्या मायदेशात नमवणे किती अवघड आहे, याची ऑस्ट्रेलियाला कल्पना आहे. मात्र, भारताची दर्जेदार फिरकी आणि अप्रतिम फलंदाजी फळी यांना अडचणीत टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सर्वच खेळाडूंना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

भरत, किशनमध्ये स्पर्धा

पहिल्या कसोटीत भारताच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर असेल. गेल्या तीन वर्षांत कोहलीने कसोटीत शतक झळकावलेले नाही. दुसरीकडे, रोहितने गेल्या १७ महिन्यांच्या कालावधीत केवळ दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे रोहित आणि कोहलीला या मालिकेत दमदार कामगिरीचा प्रयत्न असेल. तसेच ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक म्हणून केएस भरत आणि इशान किशन यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीत ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. भारतीय संघ पहिल्या कसोटीत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची दाट शक्यता असून ‘चायनामन’ कुलदीप यादव आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल यांच्यात स्पर्धा आहे.

कुलदीपला संधी?

गोलंदाजीत ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. भारतीय संघ पहिल्या कसोटीत तीन फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची दाट शक्यता असून ‘चायनामन’ कुलदीप यादव आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल यांच्यात स्पर्धा आहे. अक्षरने कसोटी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असली, तरी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीतील सातपैकी चार फलंदाज डावखुरे असणे कुलदीपच्या पथ्यावर पडू शकेल. वेगवान गोलदाजांच्या दोन स्थानांसाठी मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.

कॅमरून ग्रीन मुकणार?

बोटाची दुखापत अजून पूर्णपणे बरी न झाल्याने युवा अष्टपैलू कॅमरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, असे ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्ह स्मिथने मंगळवारी सांगितले होते. ग्रीन या सामन्याला मुकल्यास त्याच्या जागी डावखुरा मॅट रेनशॉ आणि पीटर हँडस्कॉम यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची भिस्त कर्णधार पॅट कमिन्स आणि नेथन लायन यांच्यावर आहे. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड दुखापतींमुळे पहिल्या कसोटीला मुकणार असून कमिन्सवरील जबाबदारी अधिक वाढली आहे.

  • वेळ : सकाळी ९.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 00:02 IST