बांगलादेशच्या दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १३३ धावा; २७१ धावांनी पिछाडीवर

वृत्तसंस्था, चट्टोग्राम : चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव (३३ धावांत ४ बळी) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (१४ धावांत ३ बळी) यांच्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात बांगलादेशवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशची ८ बाद १३३ धावा अशी स्थिती असून भारताच्या धावसंख्येच्या ते २७१ धावांनी पिछाडीवर आहेत. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना आणखी ७२ धावांची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने पहिल्या डावात ४०४ धावांची मजल मारल्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजीची सुरुवात अडखळत झाली. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशची ८ बाद १०२ अशी स्थिती केली होती. त्यानंतर मेहदी हसन मिराज (नाबाद १६) आणि इबादत हुसेन (नाबाद १३) यांनी यजमानांचा डाव सावरला. दोघांनी नवव्या गडय़ासाठी ३१ धावा जोडल्या आहेत.

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी ६ बाद २७८ धावांवरून पुढे खेळणाऱ्या भारताचा पहिला डाव ४०४ धावांवर आटोपला. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने श्रेयर अय्यरला (८६) गमावले. त्याला इबादतने बाद केले. त्याने आपल्या खेळीत १९२ चेंडूंचा सामना करताना दहा चौकार लगावले. यानंतर रविचंद्रन अश्विन (५८) आणि कुलदीप (४०) यांनी आठव्या गडय़ासाठी ८७ धावांची भागीदारी रचली. कुलदीपने कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक आणि सहा अर्धशतक झळकावणाऱ्या कुलदीपने १८ व्या चेंडूवर आपले खाते उघडले. त्याने आपल्या खेळीत चांगला बचाव केला. अश्विनने आपल्या खेळीत ११३ चेंडूंचा सामना करताना दोन चौकार व दोन षटकार मारले.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. मोहम्मद सिराजने नजमुल हसन शंटो (०) आणि उमेश यादवने यासिर अलीला (४) बाद करत बांगलादेशची अवस्था २ बाद ५ अशी केली. लिटन दास (२४) आणि झाकिर हुसैन (२०) यांनी बांगलादेशच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, या दोघांना सिराजने बाद केले. यानंतर कुलदीपने आपल्या फिरकीच्या जाळय़ात शाकिब अल हसन (३), मुशफिकूर रहीम (२८), नुरुल हसन (१६) आणि तैजुल इस्लाम (०) यांना अडकवत बांगलादेशच्या अडचणी वाढवल्या. तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा फॉलोऑन टाळण्याचा प्रयत्न असेल.

संक्षिप्त धावफलक

  • भारत (पहिला डाव) : १३३.५ षटकांत सर्वबाद ४०४ धावा (चेतेश्वर पुजारा ९०, श्रेयस अय्यर ८६, रविचंद्रन अश्विन ५८; तैजुल इस्लाम ४/१३३,  मेहदी मिराज ४/१२२)
  • बांगलादेश (पहिला डाव) : ४४ षटकांत ८ बाद १३३ (मुशफिकूर रहीम २८, लिटन दास २४; कुलदीप यादव ४/३३, मोहम्मद सिराज ३/१४)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India bangladesh test series kuldeep siraj dominate india ysh
First published on: 16-12-2022 at 00:02 IST