Team India on Shubman Gill: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेत आहे. भारतीय संघ एका दशकात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. अशा स्थितीत कर्णधार बदलण्याची मागणी होत आहे. ही जबाबदारी प्रदीर्घ काळ सांभाळून संघाला आयसीसी ट्रॉफी मिळवून देणाऱ्या तरुण खेळाडूला संघाचे कर्णधारपद द्यावे, असेही अनेक दिग्गजांचे मत आहे.
शुबमन गिलने यंदा शानदार फलंदाजी केली आहे. आयपीएल २०२३मध्ये तीन शतकांसह जवळपास ९०० धावा करण्याव्यतिरिक्त, त्याने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके ठोकली आहेत. त्याच वर्षी त्याने वन डेमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रमही केला आहे. अशा परिस्थितीत युवा गिलकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवावे, असे अनेकांचे मत आहे. मात्र, बीसीसीआयचे माजी निवडकर्ते भूपिंदर सिंग यावर सहमत नाहीत. “शुबमन गिल अजून नवीन आहे त्यामुळे जबाबदारी देण्याची घाई करू नये”, असे त्यांचे म्हणणे आहे. नवोदित खेळाडूला प्रथम त्यांची कामगिरी चांगली करू दिली पाहिजे, असे त्याचे मत आहे.
भूपिंदर एका मुलाखतीदरम्यान म्हणाले, “भारताच्या कर्णधारपदासाठी रोहितच्या ऐवजी शुबमनचा पर्याय असूच शकत नाही. मी यावेळी घाई करणार नाही, कारण आम्हाला त्याला देशाचा पुढचा महान फलंदाज म्हणून बघायचे आहे. त्याच्याकडे तो खेळ आणि कौशल्य आहे. येणाऱ्या काळात आपण त्याला एक चांगला खेळाडू म्हणून पाहू शकतो. त्याच्यातील नेतृत्व गुणांना अजून विकसित होऊ द्या मगच आपण यावर विचार करू शकतो.”
शुबमन गिल व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या भारताचा भावी कर्णधार होण्यासाठी उमेदवार आहेत. यापैकी पांड्या हा एकमेव असा आहे जो गेल्या काही काळापासून कसोटी संघाचा भाग नाही. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना हार्दिकने खूप प्रभावित केले आहे. २०२२च्या टी२० विश्वचषकापासून तो सतत भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करत आहे. अशा परिस्थितीत रोहितनंतर हार्दिक टी२० कर्णधार होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
हार्दिकची वन डेतील कामगिरीही उत्कृष्ट राहिली असून त्याला या फॉरमॅटमध्येही कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत भारताच्या पुढील कसोटी कर्णधाराचा प्रश्न आहे. सध्याच्या पर्यायांपैकी लोकेश राहुलचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, तर जसप्रीत बुमराहची फिटनेसची मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंतचे पुनरागमन झाले तर तो भारताचा नवा कसोटी कर्णधार होऊ शकतो.