इंग्लंड आणि श्रीलंके दरम्यान सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची जीभ घसरली होती. “बहुतेक फलंदाजांना आपली बॅट आवडत नाही. ते नेहमीच दुसऱ्याच्या बॅटला पसंती देतात. शेजाऱ्याच्या बायकोसारखं”, असं वादग्रस्त विधान त्याने समालोचन करताना केलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना दिनेश कार्तिकनं दिलगिरी व्यक्त केली आहे.

“मागच्या सामन्यात मी जे काही विधान केलं. त्याबद्दल मी माफी मागत आहे. कुणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे. मी सर्वांची माफी मागत आहे. मला माझ्या वक्तव्यासाठी बायको आणि आईकडून बराच मार मिळाला आहे. मी पुन्हा एकदा माफी मागतो, असं पुन्हा होणार नाही”, असं क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांनी तिसऱ्या दिवसीय सामन्याच्या समालोचनावेळी सांगितलं.

यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात समालोचन करताना नासिर हुसेनला डिवचलं होतं. नासिर हुसेन समालोचन करताना रोहित शर्माच्या फलंदाजीचं कौतुक करत होता. “रोहित आखुड चेंडूवर चांगला फटका मारतो. फिरकी गोलंदाज समोर असेल तेव्हा तो चांगलं फुटवर्क करतो. यातून चांगल्या खेळाचं दर्शन घडतं” असं नासीर हुसेननं सांगितलं होतं. त्यावर लगेचच दिनेश कार्तिकने प्रत्युत्तर दिलं होतं. “हे बरोबर तुझ्या विरुद्ध आहे”, असं बोलत नासीर हुसेनला डिवचलं होतं. कारण इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन पुल शॉट खेळताना अडचणीत यायचा. बहुतेक वेळा बादही व्हायचा. कार्तिकच्या वक्तव्यामुळे नासीरचं मन दुखावलं आणि त्याने स्लेजिंक करतोस का?, असं विचारलं. मात्र त्यानंतर दोघेही हसायला लागले आणि गंभीर वातावरण क्षणात निवळलं.

लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त धोनीनं आपल्या बायकोला दिलं ‘खास’ गिफ्ट!
दिनेश कार्तिक भारतासाठी आतापर्यंत २६ कसोटी, ९४ एकदिवसीय सामने आणि ३२ टी २० सामने खेळला आहे. कसोटीत २५ च्या सरासरीने त्याने १०२५ धावा, ३०.२० च्या सरासरीने एकदिवसीय सामन्यात १,७२५ धावा आणि टी २० स्पर्धेत ३३.२५ च्या सरासरीने ३९९ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक २०१९ विश्वचषक स्पर्धेपासून संघाच्या बाहेर आहे. न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा उपांत्य फेरीचा सामना खेळला होता.