पीटीआय, चेन्नई

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आज, शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये होणाऱ्या ‘क्वॉलिफायर-२’च्या लढतीत सनरायजर्स हैदराबादच्या तडाखेबंद फलंदाजांचा राजस्थान रॉयल्सच्या रविचंद्रन अश्विन आणि यजुवेंद्र चहल या फिरकी जोडीसमोर कस लागणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार असल्याने हैदराबाद आणि राजस्थानचे खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील.

यंदाच्या हंगामात साखळी फेरीत चमकदार कामगिरी केलेल्या हैदराबादच्या फलंदाजांना मंगळवारी झालेल्या ‘क्वॉलिफायर-१’च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध फारशी चमक दाखवता आली नाही. आक्रमक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला गेल्या दोनही सामन्यांत भोपळाही फोडता आलेला नाही. मात्र, हैदराबादला अंतिम फेरी गाठायची झाल्यास त्यांची हेडवरच सर्वाधिक मदार असेल. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल आणि विजेता संघ ‘आयपीएल’च्या जेतेपदासाठी कोलकातासमोर आव्हान उपस्थित करेल.

हेही वाचा >>>VIDEO : मॅक्सवेलने हात आपटला, तर विराट फोन घेऊन…; RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये पराभवानंतर घडलं तरी काय?

हैदराबाद येथील उप्पल, दिल्लीतील कोटला किंवा मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील खेळपट्ट्यांच्या तुलनेने चेपॉकची खेळपट्टी ही वेगळी आहे. या खेळपट्टीकडून नेहमीच फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर फलंदाजापर्यंत थांबून येतो. त्यामुळे फलंदाजांना सहजासहजी फटकेबाजी करता येत नाही. या परिस्थितीत हेड आणि अभिषेक शर्मा यांना आपल्या आक्रमकतेला थोडी मुरड घालावी लागू शकेल. त्यातच त्यांना अश्विन आणि चहलसारख्या गुणवान फिरकीपटूंचा सामना करावा लागणार असल्याने त्यांचे काम आणखीच अवघड होणार आहे. मात्र, हैदराबादचे फलंदाज विरुद्ध राजस्थानचे गोलंदाज हे द्वंद्व नक्कीच पाहण्यासारखे असेल.

सामन्यावर पावसाचे सावट?

‘क्वॉलिफायर-२’चा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. गेले दोन-तीन दिवस चेन्नईत तुरळक पाऊस झाला आहे. सामन्याच्या दिवशीही संततधारेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना याचा विचार करूनच खेळावे लागेल.

हेड, अभिषेकच्या कामगिरीवर नजर

हेड आणि अभिषेक या हैदराबादच्या सलामीच्या जोडीने आक्रमक खेळ करत या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले आहे. हेडने सध्याच्या हंगामात १९९.६२च्या स्ट्राइक रेटने ५३३ धावा केल्या आहेत, तर अभिषेकने २०७.०४च्या स्ट्राइक रेटने ४७० धावांचे योगदान दिले आहे. दोघांनी मिळून आतापर्यंत ७२ षटकार आणि ९६ चौकार मारले आहेत. त्यामुळे या दोघांच्या कामगिरीवरच चाहत्यांचे लक्ष असेल. याशिवाय हैदराबादसाठी हेन्रिक क्लासननेही (४१३ धावा) चमकदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ३४ षटकार लगावले आहेत. तसेच राहुल त्रिपाठीलाही आता सूर गवसला आहे. हैदराबादच्या गोलंदाजीची मदार कर्णधार पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन यांच्यावर असेल. मूळचा चेन्नईकर असणारा नटराजन घरच्या मैदानावर दमदार कामगिरीसाठी उत्सुक असेल. हैदराबादकडे चांगल्या फिरकीपटूंचा अभाव आहे आणि याचा त्यांना फटका बसू शकेल.

यशस्वी, अश्विनवर भिस्त

मूळचा चेन्नईकर असणाऱ्या रविचंद्रन अश्विनला चेपॉक येथील खेळपट्टीची चांगली कल्पना आहे. त्यातच स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात तो चांगल्या लयीतही आहे. ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध त्याने १९ धावांत दोन बळी बाद केले होते. त्याला चहलची साथ लाभेल. सहा सामने जिंकून ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश केलेल्या बंगळूरुला नमवल्यामुळे राजस्थानचा आत्मविश्वास आता दुणावला असेल. सलामीवीर यशस्वी जैस्वालने गेल्या सामन्यात चमक दाखवली. या सामन्यातही त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत. कर्णधार संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. शिम्रॉन हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांच्या आक्रमक फलंदाजीकडेही सर्वांचे लक्ष राहील. रियान परागने या हंगामात राजस्थानकडून चमक दाखवली आहे. तो कामगिरीत सातत्य राखेल अशी राजस्थानला आशा असेल.