Indian wrestlers ‘controversy: १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या झाग्रेब ओपन ग्रांप्रीमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह ५५ सदस्यीय भारतीय कुस्ती पथकाला परवानगी दिली आहे. नव्याने नियुक्त केलेल्या देखरेख समितीने क्रमवारीतील या पहिल्या स्पर्धेसाठी १२ महिला, ११ ग्रीको-रोमन आणि १३ पुरुष फ्रीस्टाइल कुस्तीपटूंची निवड केली आहे. या संघात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते रवी कुमार दहिया, अंशू मलिक आणि दीपक पुनिया यांचाही समावेश आहे, असे क्रीडा मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला पाच सदस्यीय देखरेख समिती स्थापन केली होती. या समितीकडे WFI चे दैनंदिन काम पाहण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनुभवी बॉक्सर एमसी मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये माजी कुस्तीपटू योगेश्वर दत्त, माजी बॅडमिंटनपटू आणि मिशन ऑलिम्पिक सेल सदस्य तृप्ती मुरगुंडे, माजी टॉप्स सीईओ राजगोपालन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) माजी कार्यकारी संचालक (क्रीडा) राधिका श्रीमन यांचा समावेश आहे.

हेही वाचा: IND vs NZ T20: ‘ऐकाव ते नवलच’ एकाच दिवशी भारत-न्यूझीलंड असे दोन T20 सामने, आश्चर्यकारक वेळापत्रकाने चाहते संभ्रमात

मात्र, समिती स्थापन करण्यापूर्वी त्यांचे म्हणणे घेण्यात आले नसल्याबद्दल कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवड्यात, बजरंग, विनेश आणि रवी दहिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी WFI अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर तीन दिवसीय धरणे आंदोलन केले. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरणवर हुकूमशाही आणि ज्युनियर कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. कुस्तीपटूंनी मात्र लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या खेळाडूंची ओळख उघड केली नाही. ब्रिजभूषण शरण हे भाजपचे खासदारही आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

खरं तर, विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू १८ जानेवारीपासून जंतरमंतरवर धरणे धरत होते. WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. यासोबतच त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप झाले होते. मात्र, ब्रिजभूषण यांनी कुस्तीपटूंचे आरोप साफ फेटाळून लावले. आपल्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास आपल्याला फासावर लटकवण्यात येईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा: IND vs AUS: जसप्रीत बुमराह थेट IPLमध्येच खेळणार? संपूर्ण भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला मुकणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२० जानेवारीलाच झालेल्या बैठकीनंतर भारत सरकारने कुस्तीपटूंना त्यांच्यावरील आरोपांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. यासोबतच क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष त्यांच्या पदावर काम करणार नाहीत आणि त्यांच्या दैनंदिन कामापासून दूर राहतील, असे सांगितले होते. त्यानंतर कुस्तीपटूंनी संप थांबवला होता.