बाली : इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील गुरुवारचा दिवस भारतीय क्रीडापटूंसाठी लाभदायी ठरला. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू, अनुभवी बी. साईप्रणीत आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठून जेतेपदाच्या दिशेने भक्कम वाटचाल केली.

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित सिंधूने जर्मनीच्या योन ली हिला २१-१२, २१-१८ असे सरळ दोन गेममध्ये नामोहरम केले. पुढील फेरीत सिंधूचा दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्याशी मुकाबला होईल.

पुरुष एकेरीत साईप्रणीतने बल्गेरियाच्या ख्रिस्टो पोपोव्हवर २१-१७, १४-२१, २१-१९ अशी मात केली. साईप्रणीतची पुढील फेरीत किदम्बी श्रीकांत किंवा डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनशी गाठ पडेल.

पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित सात्त्विक-चिराग यांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या कँग मिन्युक आणि सिओ सँगल यांना २१-१५, १९-२१, २३-२१ असे रोमहर्षक लढतीत नमवले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यापुढे नूर इजुद्दीन आणि गोह से फेई या मलेशियन जोडीचे आव्हान असेल.

लक्ष्य सर्वात युवा मानकरी

नवी दिल्ली : लक्ष्य सेन हा जागतिक मालिकेच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरणारा भारताचा सर्वात युवा बॅडिमटनपटू ठरला आहे. १ डिसेंबरपासून इंडोनेशिया येथे या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. २० वर्षीय लक्ष्यने गेल्या महिन्याभरात हायलो आणि डेन्मार्क स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. २०१९मध्ये पाच जेतेपद मिळवणारा लक्ष्य आता किदम्बी श्रीकांतच्या साथीने पुरुष एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करेल. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू पात्र ठरली आहे.