विशाखापट्टणम: लयीत असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रयत्न बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’ सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक नोंदवण्याचा असेल.

दिल्लीने रविवारी झालेल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला २० धावांनी नमवले होते. त्यांची गाठ आता कोलकाता संघाशी असून त्यांच्या फलंदाजांनी काही दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी केली. दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत एकच विजय मिळवला असून ते गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहेत. तर, कोलकाता दोन विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे दिल्ली कोलकाताविरुद्ध विजय नोंदवायचा झाल्यास त्यांना सर्वच विभागात आपली कामगिरी उंचवावी लागेल.

वॉर्नर, मार्शवर मदार

ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर व पृथ्वी शॉ यांच्यावर दिल्लीला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असेल. पहिल्या दोन सामन्यांत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर ऋषभ पंत गेल्या सामन्यात ३२ चेंडूंत ५१ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स व ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श आक्रमक खेळ करण्यात सक्षम आहेत. मार्श अजूनपर्यंत प्रभाव पाडता आलेला नाही व त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आनरिक नॉर्किएला अजूनपर्यंत लय सापडलेली नाही. तो दुखापतीनंतर पुनरागमन करीत आहे. दिल्लीच्या भारतीय गोलंदाजांना कोलकाताच्या भक्कम फलंदाजी फळीसमोर चांगली कामगिरी करावी लागेल.

हेही वाचा >>>RCB vs LSG : मयंकच्या वेगवान माऱ्यापुढे आरसीबीचे फलंदाज हतबल, लखनऊने २८ धावांनी नोंदवला दुसरा विजय

रसेल, अय्यरकडून अपेक्षा

कोलकाताचा संघाने गेल्या दोन सामन्यांत चमकदार कामगिरी केली आहे. सलामी फलंदाज फिल सॉल्ट, अष्टपैलू आंद्रे रसेल व वेंकटेश अय्यर हे चांगल्या लयीत आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्ध विजय मिळवायचा झाल्यास या तिनही खेळाडूंची भूमिका निर्णायक राहणार आहे. रसेल प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना अडचणीत आणण्यात सक्षम आहे. त्यातच कर्णधार श्रेयस अय्यरने बंगळूरु संघांविरुद्ध धावा केल्या आहेत, जी संघाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. रिंकू सिंहदेखील आक्रमक खेळ करण्यास सक्षम आहे.

’ वेळ : सायं. ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा.