अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्ज हे संघ आज, मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील, तेव्हा त्यांचे १८ वर्षांची जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याचे लक्ष्य असेल. ‘आयपीएल’ला २०२२ नंतर प्रथमच नवविजेता मिळणार आहे. आता जेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे क्रिकेटविश्वाची नजर असेल.

या सामन्यात सर्वांचे लक्ष कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीकडे असणार आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून बंगळूरु संघाचा भाग असलेल्या कोहलीला अद्याप जेतेपदाची चव चाखता आलेली नाही. बंगळूरु आणि कोहलीचा हा चौथा अंतिम सामना असेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोहलीला चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे. बंगळूरुने या हंगामात सुरुवातीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करताना छाप पाडली आहे. त्यांनी ‘क्वालिफायर-१’मध्ये पंजाबवर आठ गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. आता त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध दमदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा बंगळूरुचा प्रयत्न असेल.

दुसरीकडे, पंजाब संघानेही श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कामगिरी उंचावत सर्वांचे लक्ष वेधले आहे. पंजाबने ११ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. कर्णधार अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगली प्रगती केली. ‘क्वालिफायर-२’मध्ये मुंबईवर मिळवलेल्या विजयानंतर पंजाबच्या खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला असेल. श्रेयसने आधीच इतिहास रचला असून तीन वेगवेगळ्या संघाचे नेतृत्व करताना ‘आयपीएल’ची अंतिम फेरी गाठणारा तो एकमेव कर्णधार आहे. गतवर्षी त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघ विजेता ठरला होता. आता पंजाबलाही जेतेपद मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पंजाबसाठी युवा भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, जोस इंग्लिसचा अपवाद वगळता परदेशी खेळाडू फारसा प्रभाव पाडू शकलेले नाही. अंतिम लढतीत विजय मिळवायचा झाल्यास अष्टपैलू मार्कस स्टोइनिस आणि वेगवान गोलंदाज काएल जेमिसन यांसारख्या अनुभवी परदेशी खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करावी लागेल.

विराट कोहलीसाठी जेतेपद मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याने बंगळूरु आणि देशासाठी अनेक वर्षे चांगला खेळ केला आहे. जेव्हा तुम्ही बंगळूरुसारख्या संघाचे नेतृत्व करता आणि तो संघ अंतिम फेरीत गाठतो, तेव्हा नक्कीच आनंद होतो. कर्णधार म्हणून मला खूप काही शिकायला मिळाले. आम्ही येथे सर्वोत्तम खेळ करण्यासाठीच आलो आहोत. – रजत पाटीदार, कर्णधार, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु.

मुंबईविरुद्ध विजय मिळवला असला, तरीही माझे काम पूर्ण झालेले नाही. दबावाखाली खेळलेली ही माझी सर्वोत्तम खेळी असल्याचे मला वाटते. परिस्थितीनुसार खेळणे मला आवडते. आम्ही संघ म्हणून हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामाची आम्ही अहमदाबाद येथूनच सुरुवात केली आणि अंतिम सामनाही आम्ही येथेच खेळणार आहोत. त्यामुळे मी नक्कीच उत्साहित आहे. – श्रेयस अय्यर, कर्णधार, पंजाब किंग्ज.

सामन्यावर पावसाचे सावट?

पंजाब आणि मुंबई यांच्यातील ‘क्वालिफायर-२’ सामन्यात पावसाचा अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर सामना तब्बल सव्वा दोन तास उशिराने सुरू झाला. अंतिम सामन्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ दिला आहे. अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असल्याने सामना सुरू न झाल्यास तो ४ जूनला खेळविण्यात येईल. अंतिम सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अहमदाबाद येथे सोमवारी संध्याकाळनंतर वातावरण ढगाळ होते.

खेळपट्टी पुन्हाफलंदाजांना पूरक?

‘क्वालिफायर-२’ सामन्यात मुंबईने २०० धावांचा टप्पा गाठूनही त्यांना यशस्वी बचाव करता आला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यातही खेळपट्टीही फलंदाजांना पूरकच असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाऊस झाल्यास सुरुवातीचा काही काळ गोलंदाजांना मदत मिळू शकते.

कोहली, सॉल्ट, हेझलवूडवर भिस्त

●कोहलीने (६१४ धावा) या हंगामातही दमदार कामगिरी केली आहे. त्याला फिल सॉल्टने चांगली साथ दिली आगे. अंतिम लढतीतही बंगळूरु संघाला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी या दोघांवर असणार आहे.

●बंगळूरुच्या मधल्या फळीनेही या हंगामात आपले योगदान दिले आहे. विशेषत: धावांचा पाठलाग करताना संघाने कामगिरी उंचावली आहे. कर्णधार रजत पाटीदार, जितेश शर्मा आणि मयांक अगरवाल यांनी संघाला कठीण परिस्थितून बाहेर काढले आहे.

●दुखापतीमुळे आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडला गेल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते. त्याच्या तंदुरुस्तीबाबत पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्याने रोमारियो शेफर्डसह अखेरच्या षटकांमध्ये संघासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

●वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने (२१ बळी) या हंगामात बंगळूरुची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली आहे. सध्याच्या हंगामात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानी आहे. त्याला सुयश शर्मा, यश दयाल आणि भुवनेश्वर कुमारची साथ मिळते आहे.

श्रेयस, चहल, अर्शदीपकडून सर्वाधिक अपेक्षा

●यंदाच्या हंगामात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने (६०३) धावांचा रतीब घातला असून सलग दुसऱ्यांदा तो जेतेपद मिळवण्याच्या शर्यतीत आहे. त्याने संघ अडचणीत असताना निर्णायक योगदान देत विजयश्री खेचून आणला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या ‘क्वालिफायर-२’च्या लढतीत त्याने ४१ चेंडूंत नाबाद ८७ धावांची अप्रतिम खेळी केली.

●मार्को यान्सनविना पंजाबची गोलंदाजी कमकुवत भासत होती. मात्र, अन्य गोलंदाजांनी मुंबईविरुद्ध खेळ उंचावताना प्रतिस्पर्धी फलंदाजांवर काही अंशी वेसण घातली. अर्शदीप सिंगकडून सर्वाधिक अपेक्षा असतील.

●युजवेंद्र चहल जायबंदी झाल्याने त्याला काही सामन्यांना मुकावे लागले. ‘क्वालिफायर-२’मध्ये त्याने सहभाग नोंदवला. मात्र, त्याला यश आले नाही. अंतिम सामन्यात त्याचा कामगिरीत सुधारणेचा प्रयत्न असेल.

●प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्या, नेहाल वढेरा आणि शशांक सिंह या ‘अनकॅप्ड’ खेळाडूंनी या हंगामात प्रभाव पाडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●वेळ : सायं. ७.३० वा. ●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.